
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका-इराणमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. या चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने प्रस्तावित करार नाकारला, तर अमेरिका त्यांच्या पुलांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करेल आणि ते उद्ध्वस्त करेल. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका विस्तृत पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी इराणवर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणने होर्मुझमध्ये गोळीबार केला. ते शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे. त्यांनी सांगितले की या हल्ल्यात फ्रान्स आणि ब्रिटनच्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार केला, तो आमच्या शस्त्रसंधी कराराचे संपूर्ण उल्लंघन आहे. एका फ्रेंच जहाजावर आणि युनायटेड किंगडमच्या एका मालवाहू जहाजावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या.
ट्रम्प असेही म्हणाले की, इराणच्या कृती त्यांच्याच विरोधात जात आहेत. आम्ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाकेबंदी अधिक मजबूत आणि कडेकोट करत आहेत. ते नकळतपणे आम्हाला मदत करत आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे त्यांना दररोज अंदाजे ५०० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसत आहे. इराणने न्याय्य आणि योग्य करार स्वीकारला नाही, तर अमेरिका मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, टेक्सास, लुइझियाना आणि अलास्का येथील अनेक जहाजे अमेरिकेत माल भरत आहेत. हे सर्व आयआरजीसीमुळे (IRGC) होत आहे. आम्ही एक अतिशय योग्य आणि न्याय्य करार देऊ करत आहोत आणि आशा आहे की ते तो स्वीकारतील. जर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि प्रत्येक पूल नष्ट करेल. आता आणखी नरमाई दाखवली जाणार नाही. त्यांनी तडजोड केली नाही, तर आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. हे काम गेल्या ४७ वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते. आता इराणची संहारक यंत्रणा मोडून काढण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुष्टी केली आहे की, अमेरिकेचे प्रतिनिधी चर्चेसाठी इस्लामाबादला जात आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, माझे प्रतिनिधी पाकिस्तानच्या इस्लामाबादला जात आहेत. ते उद्या संध्याकाळी तिथे पोहोचतील. यापूर्वी, न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर सोमवारी रात्री इस्लामाबादला पोहोचतील.


























































