त्या महिलेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही! 19 किलो गांजा बाळगणाऱ्या याचिकाकर्तीची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 किलो गांजा बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. ती एक महिला असून तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने 25 हजारांच्या जात मुचलक्यावर आरोपी महिलेचा जामीन मंजूर केला.

27 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सोनाली मोहिते या महिलेला पकडले व तिच्याकडून 19 किलो 624 ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, 1985 च्या कलम 8 (क), 20(ब)(2), 20(ब), 29 अन्वये गुन्हा नोंदवला. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सोनालीने अॅड. विवेक आरोटे, अॅड. अक्षय डिंगळे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, जप्त केलेला गांजा हा मध्यम प्रमाणात होता. अर्जदार ही महिला असून तिचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. ती 1 वर्ष आणि 4 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात आहे. तर सरकारच्या वतीने अॅड. गौरी राव यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदाराकडून थेट गांजा जप्त करण्यात आला आहे.