मणिपुरात दहशतवाद्यांकडून गोळीबारात दोघांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

3 मे 2023 पासून मणिपुरात अशांतता असून, सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या तीन वर्षांत लाखो लोकांचे व्यवसाय आणि विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यादरम्यान अद्यापही ही धग कायम असताना दहशतवाद्यांनी वाहनावर गोळीबार करत दोघांची हत्या केली. उखरुल जिह्यात निवृत्त लष्करी जवान एसडब्ल्यू चिनाओशांग (46), यरुइंगम वाशुम (42) इंफाळहून उखरुलला जाताना दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.

एक दिवस आधीच मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उखरुलला भेट दिली होती आणि कुकी तसेच नागा समुदायांना शांतता व संवाद राखण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांच्या शोधात शोधमोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुकी जो कान्सिलने या घटनेत समुदायाच्या कोणत्याही भूमिकेचा इन्कार केला आहे. तर, तंगखुल नागा लाँगच्या कार्यकारी समितीने घटनेचा निषेध केला. त्यांनी आरोप केला की, हा हल्ला कुकी समुदायाने केला आहे. समितीने परिसरात त्वरित शोध मोहीम राबवण्याची आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.