एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 बसगाड्यांची भर, वर्षाखेरीपर्यंत 8000 नव्या ‘लालपरी’ प्रवासी सेवेत धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 नव्या बसगाड्यांची भर पडणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेंतर्गत 3000 बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. या कार्यवाहीला गती देत महामंडळाने गाड्यांच्या ‘डिलीव्हरी’चे अंतिम नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्यात टाटा आणि अशोक लेलॅण्ड या कंपन्यांच्या प्रत्येकी 200 नव्या बस प्रवासी सेवेत धावणार आहेत. चालू वर्षाखेरीपर्यंत एकूण 8000 बसगाडय़ा ताफ्यात दाखल होणार आहेत.

राज्याच्या खेडोपाडय़ात एसटीची सेवा देण्याचे उद्दीष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यानुसार 3×2 आसन व्यवस्था असलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेच्या आरामदायी बस प्रवासी सेवेत दाखल केल्या जात आहेत. सध्या 150 नव्या बसगाडय़ा सेवेत उतरल्या असून पुढील आठवडाभरात 50 गाडय़ा ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. 3000 स्मार्ट बससेवेची वेळेत डिलीव्हरी करण्याचे नियोजन एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेने केले आहे. येत्या सहा महिन्यांत 3000 गाड्यांची पूर्तता केली जाणार आहे. त्यानुसार टाटा आणि अशोक लेलॅण्ड या कंपन्यांना दरमहा प्रत्येकी 200 गाडय़ा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने बसगाडय़ा उपलब्ध होतील, त्यानुसार त्या गाड्यांचे मार्ग निश्चित करून प्रवासी सेवा आणखी सुकर केली जाईल, अशी माहिती महामंडळाच्या वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या अपुऱ्या बससंख्येमुळे प्रवाशांना तासन्तास बसस्थानकांवर थांबावे लागते.

5000 गाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण

यंदा एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या 8000 ने वाढणार आहे. त्यात 3 हजार गाड्यांचे उद्दिष्ट निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण केले जाईल. तसेच उर्वरित 5 हजार गाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या गाडय़ादेखील वर्षाखेरीपर्यंत ताफ्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.