
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरहून पुण्याला हलवण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली 1 मे रोजी तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर गड स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. तिथून परतल्यापासून त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू होते. मात्र फरक न पडल्याने त्यांना आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हलवण्यात आले आहे. निलेश लंके यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही रुटीन चाचण्या करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काळजीचे कारण नाही
दोन दिवसांपूर्वी दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे माझी प्रकृती थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, अशी माहिती निलेश लंके यांनी शुक्रवारी एक्सवर पोस्ट करून दिली.
“दोन दिवसांपूर्वी दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे माझी प्रकृती थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन!”
– खा.निलेश लंके
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) May 8, 2026



























































