
पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडली असताना आता तृणमूल काँग्रेसचे २० खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. इंग्रजी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत ८० पैकी ६० आमदारांनी वेगळा गट करून तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आणि त्या गटाला तात्काळ मान्यता देखील मिळाली. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ऋतब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती जाहीर केली. विधानसभेतील या फुटीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच आता २० खासदार फुटणार असे वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
सूत्रांनी ‘एनडीटीव्ही‘ला दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे किमान २० खासदार भाजपच्या संपर्कात असून ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असू शकतात. सूत्रांनी पुढे सांगितले की, या संदर्भातील चर्चा अगदी वरिष्ठ पातळीवर सुरू असून या खासदारांनी आपली पक्षांतर करण्यात रस दाखवला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून तृणमूल काँग्रेसचे एकूण ४१ खासदार आहेत — ज्यामध्ये लोकसभेत २८ आणि राज्यसभेत १३ खासदार आहेत.
खासदारांमध्ये अशी फूट पडली, तर तो ममता बॅनर्जी यांच्यासाठी खूप मोठा सेटबॅक ठरेल. विरोधी पक्षांच्या संख्याबळाचा विचार केला तर त्यांचा पक्ष खासदारांच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे आणि तिथे फूट पडली तर संसदेत तृणमूल काँग्रेसची ताकद कमी होईल.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या संकेतांनुसार, येत्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेतही आणखी फूट पडू शकते, ज्यामुळे या फुटीर गटाचे स्थान अधिक मजबूत होईल. ममता बॅनर्जी यांचे लक्ष आता पक्षाचे नाव आणि चिन्ह टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांकडे वळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

























































