
‘लष्करी भरतीसाठी मोदी सरकारने आणलेली ‘अग्निवीर’ योजना ही फक्त अदानीच्या फायद्यासाठी आहे. सैन्यावर आणि संरक्षणावर खर्च केला जाणारा पैसा अदानीच्या खिशात जावा हा यामागचा मोदींचा उद्देश आहे,’ असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
उत्तराखंड येथील माजी सैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. देशाची सुरक्षा आणि सैन्याच्या बाबतीत मोदी सरकार किती बेफिकीर व उदासीन आहे हे सांगताना त्यांनी अग्निवीरचा दाखला दिला. ‘अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची चार वर्षांसाठी सैन्यात भरती केली जाते. या काळात शत्रूशी लढताना अग्निवीर शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुठलेही संरक्षण किंवा लाभ मिळत नाहीत. ही कल्पनाच सैन्याच्या विरोधात आहे, असे राहुल म्हणाले. ‘हिंदुस्थानात कोटय़वधी तरुण सैन्यात जाण्यासाठी अतोनात कष्ट घेतात. त्यांचे भविष्य सुरक्षित असावे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आमचा अग्निवीर योजनेला विरोध आहे. आमचे सरकार आल्यानंतर ही योजना रद्द करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.


























































