उद्योगपती मित्रांसाठी ग्रेट निकोबारचा वारसा नष्ट करण्याचा सरकारचा डाव; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधींनी पर्यावरण दिनानिमित्त पुन्हा एकदा ग्रेट निकोबार प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकार ग्रेट निकोबार बेटांवर एक ट्रान्सशिपमेंट बंदर आणि संरक्षण प्रकल्प उभारणार आहे. मात्र, त्याचा उद्देश एका मोठ्या उद्योगपतीला फायदा पोहोचवणे हा आहे. सरकार या प्रकल्पाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित पाऊल म्हणत आहे, परंतु हा प्रकल्प देशाचा वारसा नष्ट करू शकतो, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पर्यावरण दिनानिमित्त, काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, या प्रकल्पाचा उद्देश एका व्यावसायिकाला फायदा पोहोचवणे हा आहे. हे राष्ट्रीय हिताचे नाही. राहुल गांधी यांनी शुक्रवारी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ एप्रिलमध्ये त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना दिलेल्या भेटीवर आधारित आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते. या प्रकल्पामध्ये झाडे तोडणे आणि प्रवाळ खडकांचे नुकसान करणे यांचा समावेश असेल. या भागात राहणारे आदिवासी समुदाय विस्थापित होतील. सरकारचे हे पाऊल राष्ट्रीय हिताचे नाही. संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेचे निमित्त करून सरकार आपला खरा उद्देश लपवण्याचा प्रयत्न करत आहे,असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींनी आरोप केला आहे की, ग्रेट निकोबार प्रकल्पांतर्गत १.५ कोटी झाडे तोडली जातील. अनेक महत्त्वाचे प्रवाळ खडक अधिकृत कागदपत्रांमधून काढून टाकण्यात आले आहेत. एकेकाळी सरकारने वसवलेल्या निकोबार बेटांवरील समुदायांना विस्थापित केले जाईल. हे सर्व केवळ तिथे हॉटेल्स, कॅसिनो आणि रिअल इस्टेट प्रकल्प उभारता यावेत यासाठी होत आहे. बाधित लोकांना योग्य नुकसान भरपाईसुद्धा मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.

निकोबारला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी काम केले पाहिजे. राहुल गांधी म्हणाले की, ग्रेट निकोबार हा देशाच्या सर्वात संवेदनशील आणि समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे. मात्र, या प्रकल्पामुळे सागरी जैवविविधतेचे तसेच निकोबारच्या आदिवासी संस्कृतीचे मोठे नुकसान होईल. ग्रेट निकोबारचा विनाश करण्याऐवजी सरकारने त्याला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी काम केले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.