
युगांडाहून राजस्थानमध्ये आलेल्या एका परदेशी नागरिकामध्ये इबोलासारखी लक्षणे आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्या असून राज्याच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. युगांडाहून आलेली आणि शुक्रवारी सकाळी शारजाहमार्गे जयपूरला पोहोचलेली ही महिला विमानतळावरील नियमित तपासणीत इबोलाची लक्षणे असल्याने निदर्शनास आली. तिला त्वरित जयपूरच्या आरयूएचएस रुग्णालयात दखल करत क्वारंटाइन करण्यात आले असून, तिचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आरयूएचएसचे अधीक्षक अनिल गुप्ता यांनी सांगितले की, अद्याप या महिलेला इबोलाची लागण झाल्याची पुष्टी झालेली नाही. पुण्याच्या प्रयोगशाळेतून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अहवाल मिळण्याची शक्यता असून त्यानंतरच संसर्गाची खात्री होईल.
याआधी गुरुवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका सुदानी नागरिकालाही थर्मल स्क्रीनिंगदरम्यान ताप असल्याचे आढळले होते. या प्रवाशाला सिकंदराबादच्या गांधी रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले असून त्याचे नमुने सीसीएमबीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानला अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.


























































