
बॉबी देओल आणि अनुराग कश्यप यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ‘बंदर’ या चित्रपटातून एकत्र आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘बंदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 50 ते 60 लाखांची कमाई केल्याचे समोर आले आहे. देशभरात मोठ्या प्रमाणावर शो असूनही थिएटरमधील प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत कमी राहिली. त्यामुळे चित्रपटाची सुरुवात निराशाजनक ठरली आहे.
मात्र हा चित्रपट पारंपरिक व्यावसायिक फॉर्म्युल्यापेक्षा वेगळा आहे. डार्क क्राइम थ्रिलर या प्रकारातील या चित्रपटात अनुराग कश्यप यांची खास शैली पाहायला मिळते. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर बॉबी देओलच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी नकारात्मक भूमिका साकारल्या.
‘बंदर’मध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. चित्रपटाची कथा आणि बॉबीचा अभिनय ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पहिल्या दिवसाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी असली, तरी चित्रपटाच्या भवितव्याचा निर्णय वीकेंडच्या कमाईवर अवलंबून असेल. सकारात्मक प्रसिद्धी मिळाल्यास शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकसंख्या वाढू शकते. अन्यथा चित्रपटासाठी पुढील वाटचाल कठीण होण्याची शक्यता आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
याच काळात प्रदर्शित झालेल्या पेड्डी या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. तर है जवानी तो इश्क होना हैं या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत ‘बंदर’ला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी येणारे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.






























































