
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलेले वित्त आणि नियोजन खाते पुन्हा मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आग्रही झाला आहे. पक्षाला अर्थखाते परत देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 22 जूनपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी अर्थखात्याबाबत निर्णय व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे घेतले तेव्हापासून वित्त खाते फडणवीस यांच्याकडे आहे.






























































