
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पिक विमा, कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, खतांचा पुरवठा, हमीभाव आदी १५ मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
यवतमाळ जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून सततची नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वाढता उत्पादन खर्च, बोगस बियाणे व खते, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि रखडलेले पिक विमा दावे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचा रखडलेला पिक विमा तात्काळ मंजूर करावा, कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, कृषीपंपांना अखंडित वीजपुरवठा करावा तसेच वन्यप्राण्यांमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
शासनाने येत्या १५ दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.




























































