
अमेरिकेच्या युएस सेंट्रल कमांडने आखाती क्षेत्रात हिंदुस्थानी जहाजांवर क्षेपणास्त्रे डागल्याची कबुली दिली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ हिंदुस्थानी क्रू असलेल्या जहाजाला आग लागल्यानंतर अमेरिकेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सेंट्रल कमांडने हे मान्य केले आहे की, त्यांनी जहाजाच्या इंजिन रूमवर दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागली होती. या आठवड्यात ओमानमध्ये हिंदुस्थानी क्रू असलेल्या जहाजावर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
युएस सेंट्रल कमांडने X वर पोस्ट करत माहिती दिली की, युएस सेंट्रल कमांडने गिनी-बिसाऊचा झेंडा असलेल्या एम/टी जलवीर जहाजावर कारवाई केली. हे जहाज ओमानच्या आखातामार्गे इराणमधून तेल नेण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन लष्कराच्या सूचनांचे वारंवार पालन न केल्याने, अमेरिकेच्या एका विमानाने जहाजाच्या इंजिन रूममध्ये दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागली.
CENTCOM च्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी नाकेबंदी सुरू झाल्यापासून युएस सेंट्रल कमांडने नियमांचे पालन न करणाऱ्या ९ जहाजांना निकामी केले आहे. याशिवाय नियमांचे पालन करणाऱ्या १३५ जहाजांचा मार्ग बदलण्यात आला आहे, तर मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या ४२ जहाजांना पुढे जाऊ दिले आहे.
दरम्यान, हिंदुस्थानने या आत्मघाती हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनांना अत्यंत चिंताजनक ठरवले असून, हे हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.




























































