
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील अलीपूर भागात असणाऱ्या एका 10 मजली सरकारी इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये जवळपास 4 हजार ईव्हीएम जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या ईव्हीएमचा वापर पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये करण्यात आला होता. या निवडणुकीमध्ये भाजपने 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत 200 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. या प्रकरणी आता पोलिसांनी एफआयआर नोंदवून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.
‘डेक्कन हेराल्ड‘ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल 24 तासांहून अधिक वेळ लागला. या दहा मजली इमारतीमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषद कार्यालयाव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत.
दरम्यान, राज्याचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आगीत जवळपास 4 हजार ईव्हीएम पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ही सर्व मशिन्स यंदाच्याच वर्षात राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 10 मतदारसंघांमध्ये वापरण्यात आली होती.
सुरुवातीला ही आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला लागली होती. चौथा, पाचवा आणि सहावा मजला सुरक्षित राहिला असताना, आग थेट सातव्या, आठव्या आणि त्यानंतर नवव्या-दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत दक्षिण 24 परगणा जिल्हा प्रशासनाच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अलीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून तात्काळ एफआयआर नोंदवला आहे. सध्या संपूर्ण इमारतीची नाकेबंदी करण्यात आली असून सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की यामागे काही ठरवून केलेला कट होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही एक्सवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.


























































