FIFA World Cup 2026 – घरच्या मैदानावर मेक्सिकन वादळ, सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्ड कपच्या उद्घाटन सामन्यात सहयजमान मेक्सिकोने घरच्या चाहत्यांना जल्लोषाची मेजवानी देत दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. खचाखच भरलेल्या ऍझटेका स्टेडियममध्ये एल ट्रायने पहिल्या मिनिटापासूनच आक्रमणाचा झंझावात उभा केला. त्याचे फळ नवव्या मिनिटाला मिळाले, जेव्हा जुलियन क्विनोन्सने अचूक फटका मारत स्पर्धेतील पहिला गोल नोंदवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र मेक्सिकोच्या भक्कम बचावापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

दुसऱया सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या. 49 व्या मिनिटाला स्पेफेलो सिथोलेला रेड कार्ड दाखवण्यात आले आणि त्यानंतर सामना पूर्णपणे मेक्सिकोच्या ताब्यात गेला. एका खेळाडूच्या संख्यात्मक फायद्याचा पुरेपूर लाभ घेत राउल जिमेनेजने 67 व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेची अवस्था आणखी बिकट झाली, जेव्हा 84 व्या मिनिटाला वारच्या मदतीने थेम्बा ज्वानेलाही रेड कार्ड दाखवण्यात आले. अखेरीस इंज्युरी टाइममध्ये मेक्सिकोच्या सीझर मॉन्टेसलाही रेड कार्ड मिळाले, पण त्याचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही. दोन गोल, दणदणीत वर्चस्व आणि विजयी सलामीसह मेक्सिकोने वर्ल्ड कप जिंकण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षा दाखवून दिल्या.