
पंडित जवाहरलाल नेहरू हे 1947-48 पासून देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल होते. जर भाजप पंडित नेहरूंना 1947-48 पासून पंतप्रधान मानायला तयार नसतील, तर ते आंबेडकरांना पहिले कायदामंत्री आणि सरदार पटेलांना पहिले गृहमंत्रीही मानायला तयार नसतील, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्षे पूर्ण झाली. मोदींनी पंडित नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम मोडल्याचा दावा भाजपकडून केला जाऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मोदींसारखा दुसरा कुणी नेता होऊच शकत नाही असेही म्हटले. याचाही संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला.
मोदी हे मोदीच आहेत, दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अधोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊच शकत नाही. पंडित नेहरू हे साधारण 16 वर्षे पंतप्रधान होते. हे 12 वर्षांचा हिशेब मोदींनी कुठला काढला? जर ते नेहरूंना 1947-48 नंतर पंतप्रधान मानायला तयार नसतील तर सरदार पटेल यांना पहिले गृहमंत्री आणि बाबासाहेब आंबेडकर यांनाही पहिले कायदामंत्री मानायला तयार नसतील. हे सगळे फक्त मोदीच करू शकतात. म्हणून मोदी हे मोदीच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
काँग्रेसला डुबते जहाज म्हणणाऱ्या फडणवीसांचा राऊत यांनी समाचार घेतला. मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृतीविरुद्ध ठामपणे लढायचे असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला हवे हे मी स्पष्टपणे सांगितले आहे. जनता पक्षाच्या काळात आम्ही सर्व काँग्रेसविरुद्ध एकत्र आलो होतो. त्यामुळे आता भाजपशी लढायचे असेल तर काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून वेळोवेळी काही कारणाने बाहेर पडलेले पक्ष, नेते या सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. शरद पवार हे सगळ्यात ज्येष्ठ नेते असून त्यांनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे. तरच देशात बदल आणि परिवर्तन शक्य आहे. काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींनाही आव्हान निर्माण झाले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडते जहाज नव्हते. काँग्रेसने कायम या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्या एक टक्के काम भाजपने केल्याचे दाखवा. ते स्वातंत्र्याच्या लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नाच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते. हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 मध्ये मुंबईत आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो तेव्हा हे सगळे घरात बसून होतो. हे डरपोक लोक आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी या देशात कुणाला घाबरत असतील तर राहुल गांधी यांना. प्रामाणिक आणि लढणाऱ्या माणसाला भ्रष्ट नेत्याने घाबरायलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.



























































