
<< माधव गवाणकर
खास विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले अंधविश्वासविरोधी कुमार साहित्य तसे कमीच असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वतः प्रकाशित केलेले ‘राशिभविष्याची ऐशीतैशी’ हे छोटेखानी पुस्तक हा असाच एक लक्षवेधी प्रयत्न आहे. रघुनाथ मेटकरी, सुबोध जावडेकर आणि प्रमोदिनी मंडपे या तीन कथाकारांच्या तीन रंजक, उद्बोधक कथा प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोपी भाषा, साधी मांडणी आणि विषय थोडक्यात मांडण्याचे कौशल्य यामुळे हे रंगीत, आकर्षक पुस्तक वाचनीय झाले आहे. विचार करणाऱ्या हुशार मुलामुलींना ते अधिक आवडेल.
अशा विषयावरील कोरडे व्याख्यान विद्यार्थ्यांवर फार प्रभाव टाकत नाही. कथारूपात केलेले प्रबोधन मात्र तयांच्या मनाला भिडते. ‘राशिभविष्याची ऐशीतैशी’ या सुबोध जावडेकरांच्या कथेत भविष्याचा फोलपणा फार सहजसुंदर पद्धतीने मुलांचे भावविश्व लक्षात घेऊन मांडण्यात आला आहे. त्यात कृत्रिमता नाही. मुलांना प्रिय असलेल्या सहलीला जाणे आयत्या वेळी नाकारणारा कथेचा प्रतीक हा नायक. ‘प्रवास टाळावा’ या त्या दिवशीच्या त्याच्या राशीच्या भविष्याची त्याला वाटलेली भीती, सहल बुडवली तरी त्याचेही होणारे दुःख हा सगळाच कथाभाग रंगतदार झाला आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या कथेचा शेवट मजेदार, मार्मिक झाला आहे. ‘भविष्य’ हे शास्त्र नाही. त्यामुळे त्याचे भय, चिंता बाळगण्याचे कारण नाही या समितीच्या ठाम भूमिकेशी ही हलकीफुलकी कथा पूरक आहे.
‘देवरूसी विठ्ठल बापू’ या कथेत रघुनाथ मेटकरी यांनी भोंदूबाबाच्या बुवाजीच्या विषयावर प्रकाश टाकला आहे. बुवा महाराज युक्ती करून हातचलाखीने कसे बनवतात त्याचाही नाट्यमय संदर्भ कथेत आहे. बुवाबाजी हा ‘व्यवसाय’ आहे. त्यातून कमाई होते हेसुद्धा या कथेत मुलांना आपोआप कळते. थोड्या मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांना जागे करणारी, सावध करणारी ही कथा छायाचित्रे आणि एकूण पुस्तकाची (निर्मितीची) गुणवत्ता यामुळेही लक्ष वेधून घेते. वेगवेगळ्या ‘घरच्या’ म्हणजे कौटुंबिक समस्यांमुळे लोक बुवाच्या नादी लागतात हा संस्कारही मेटकरींची कथा देतेच. लबाडी, खोटेपणा याविरोधात ही कथा कळत-नकळत भाष्य करते. थोडे ‘नाटक’ करून बुवाला पकडणे, त्याची ढोंगबाजी सर्वांच्या लक्षात आणून देणे शक्य आहे, असा बोध या कथेतून अकृत्रिम पद्धतीने पडतो. मात्र ती कथा असल्यामुळे गोष्टीतील काही वाक्यांत वर्तमानकाळ टाळला असता तर अधिक बरे झाले असते.
प्रमोदिनी मंडपे या अनुभवी, ज्येष्ठ लेखिकेने ‘ग्रहणाची भीती’ या कथेतून ग्रहणाबद्दचे गैरसमज फार सहजतेने दूर केले आहेत. खरे तर या पुस्तकासाठी कथा देणारे हे तीनही साहित्यिक ‘कार्यकर्त्याच्या भूमिकेतून लिहित आहेत. त्यांची काही ‘भूमिका’ आहे हे उघड आहे. अंधश्रद्धेमुळे प्रकृतीही बिघडते हे या कथेतून लेखिका पात्रांच्या माध्यमातून स्पष्ट करते.
या सर्व कथांमधील सूचक आशय कुमार वाचकांना विज्ञाननिष्ठ दृष्टी नक्कीच देईल. संवादाचा वापर केल्यामुळे कथा ‘बोलकी’ बनते. नभोवाणीसाठीही तिचा उपयोग करता येईल. ग्रहणाचे शास्त्राrय स्पष्टीकरण व सत्य माहिती ही कथा देते. मुलींना ही कथा जास्त अपील होईल. ग्रहणाबद्दलचे गैरसमजही ती दूर करते. सुबक मांडणी, गुळगुळीत, चकचकीत रूप यामुळे पुस्तक चटकन ‘उचलले’ जाईल.
अशा उपयुक्त कथा पाठ्यपुस्तकांत समाविष्ट होतील तो सुदिन. अंनिसने बाल-कुमार साहित्य प्रकाशनावर अधिक भर द्यावा.
राशिभविष्याची ऐशीतैशी
लेखक ः सुबोध जावडेकर
प्रमोदिनी मंडपे, रघुनाथ मेटकरी
प्रकाशक ः अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मूल्य ः 150 रु.


























































