स्त्री-लिपी – वारल्यांची गोदाराणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी ([email protected])

असंघटित क्षेत्राचे प्रश्न, त्यांचे संघर्ष याविषयी तळमळीने कार्य करीत आदिवासींच्या शोषणाविरूद्ध जागृतीचं काम करणाऱया गोदावरी परुळेकर यांनी काळाच्या पुढे चालण्याचा वस्तुपाठच घालून दिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात माणसातला माणूस जागा करणारी एक विलक्षण धाडसी स्त्री इथं होऊन गेली. गोदावरी परुळेकर तिचं नाव. 1936 साली तिनं कामगार चळवळीत थेट उडी घेतली. सर्वसाधारण मध्यमवर्गीय स्त्रियांत तेव्हा घराबाहेर पडून अर्थार्जन करण्याचाही धीटपणा नव्हता, समाजालाही स्त्रीचा घराबाहेरच्या अवकाशातला मोकळा वावर फारसा अंगवळणी पडला नव्हता, त्या काळातही  बीएएलएलबी झालेली तरुणी कामगार चळवळीत उतरून त्यांच्यात शोषणाविरूद्ध जागृतीचं काम करायला लागली होती.

14 ऑगस्ट 1908 चा त्यांचा जन्म. माहेरच्या त्या गोदावरी गोखले. वडील नामांकित वकील. त्यामुळे घरातूनच कायदा आणि न्याय यांचे बाळकडू त्यांना मिळाले. कुटुंबातील प्रागतिक विचारांच्या पार्श्वभूमीचा अत्यंत उत्तम लाभ बाईंनी करून घेतला. काळाच्या पुढे चार पावले चालण्याचा बळ त्यांनी कमावलं.

पुढे 1940 मध्ये साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1945 मध्ये दोघे टिटवाळा येथील ‘महाराष्ट्र प्रांतिक किसान अधिवेशना’च्या प्रचारासाठी तलासरी, डहाणू येथे गेले असता त्यांना तिथल्या आदिवासींच्या अपेष्टांचं दर्शन झालं. त्यांचं भुकेकंगाल आणि परस्वाधीन जिणं पाहून त्यांनी तिथेच काम करायचं ठरवलं. तिथे प्रस्थापित असलेल्या जमीनदारीविरुद्ध लढा उभारणं सोपं नव्हतं. वारल्यांना हिंमत देणं, त्यांची संघटना बांधणं फार कठीण होतं. दोघांनी एकत्रितपणे 1945 ते 1953 या काळात डहाणू परिसरात वारली या आदिवासी जमातीमध्ये जागृतीचं काम केलं.

आदिवासींमध्ये असलेली वेठबिगार पद्धत, त्यापायी होणारं त्याचं शोषण याविरोधात बाई अखंडपणे संघर्ष करत राहिल्या. अनेकदा त्यापायी त्या तुरुंगातही गेल्या. हे सारे अनुभव त्यांनी ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहून ठेवले आहेत.

हे शीर्षकच किती बोलके आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अत्यंत प्रांजळपणे त्यांनी  लिहिले आहे, ‘माझे सारे शिक्षण पुण्यात झाले. सार्वजनिक जीवनाच्या प्रथमावस्थेत माझी कर्मभूमी मुंबई होती. आदिवासी प्रदेशाची मला मुळीसुद्धा कल्पना नव्हती.’ अशा स्त्रीनं वारली लोकांमध्ये राहून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यातला  माणूस जागा केला, ही किती मोठी गोष्ट आहे, याची आज आपल्याला खरी कल्पना येणं अवघड आहे. त्यात छुपे हल्ले, हद्दपारी यांचाही सामना त्यांना करावा लागला, पण त्यांनी या कामात स्वतला अक्षरश झोकून दिलं होतं. कोंडय़ाची भाकर, वेठीच्या आसाचा फेरा हे या पुस्तकातले भाग वारल्यांची करुणास्पद स्थिती उभी करतात. आदिवासींच्या शोषणाचा आणि त्यांच्यावरील अन्यायाचा हा अत्यंत ज्वलंत आणि हृदयस्पर्शी इतिहासच आहे. पुस्तकात कुठेही त्या स्वतविषयी एक शब्दही अधिकचा लिहीत नाहीत. तरीही त्यांनी आदिवासींना जागृत करताना दाखवलेली निष्ठा, चिकाटी, धैर्य, सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांचे नेतृत्त्वगुण, चातुर्य या वैशिष्टय़ांचा प्रत्यय पुस्तक वाचताना ठायी ठायी येतो. आदिवासी लढय़ाची हकीकत सांगणं, हाच या पुस्तकाचा हेतू आहे आणि तो पूर्णपणे साधला आहे.

एकूणच असंघटित क्षेत्राचे प्रश्न, त्यांचे संघर्ष यांविषयी आपण खूपच अनभिज्ञ असतो. गोदावरी बाईंनी हे पुस्तक लिहिण्याचा हेतू सांगताना म्हटलं आहे की, अशा परिस्थितीत राहणाऱया इतरांचेही प्रश्न पुन्हा एकदा लोकांसमोर आले पाहिजेत, तिथे किती काम करण्याची अजून आवश्यकता आहे त्याची जाणीव व्हायला हवी आहे. म्हणजेच कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात तळमळ निर्माण व्हावी या हेतूनं त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

वारल्यांनी त्यांना ‘गोदाराणी’ हा किताब दिला, पण त्याचाही उल्लेख त्यांनी केला नाहीये. निरलसपणे कार्य करणे म्हणजे काय, याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. आत्मचरित्रे लिहिताना अनेकदा आत्मसमर्थन केले जाते, कधी इतरांच्या वर दोषारोप केले जातात. ‘मी’पणा अधिक डोकावतो, पण ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे आत्मचरित्र या सर्वांना खणखणीत अपवाद आहे. 1972 साली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.

आजच्या काळात तर सर्वांनी जरूर वाचावे आणि एका झुंजार स्त्रीकडून प्रेरणा घ्यावी असे हे पुस्तक!

(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)