
आसाममधील जोरहाट येथे उतरताना हिंदुस्थानी हवाई दलाच्या मालवाहतूक विमानाला शनिवारी भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातग्रस्त अन्तोनोव एएन-32 हे विमान रशियन बनावटीचे होते. लष्करी साहित्याने भरलेल्या या विमानाने सकाळी दहा वाजता जोरहाटहून चाबुआसाठी उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाने लँडिंगची विनंती केली. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाच विमान धावपट्टीला समांतर असलेला टॅक्सी वे ओलांडून पुढे गेले आणि कोसळले.हा अपघात इतका भयानक होता की कोसळताच विमानाचे दोन तुकडे झाले आणि आग लागली. त्यात मुख्य पायलटसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहवैमानिक जबर जखमी झाला. त्याच्यावर जोरहाट येथील हवाई दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहीदांमध्ये दोन अग्निवीर
शहीद जवानांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांचा समावेश आहे. हवाई दलाने या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीचे आदेश दिले आहेत.
एएन-32 चा दहा वर्षांत तिसरा अपघात
गेल्या दहा वर्षांत एएन-32 या विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे. हे विमान 1984 साली तत्कालीन सोव्हिएत युनियन अर्थात रशियाकडून खरेदी करण्यात आले. हे विमान हवाई दलाच्या लॉजिस्टिक विभागाचा कणा मानले जाते. गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातामुळे या विमानाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2016 पासून झालेल्या अपघातात हवाई दलाच्या 42 जवानांचा मृत्यू झाला आहे.


























































