
>> देविदास त्र्यंबके
मुख्यमंत्री असूनही गृहमंत्रीपदाचे ओझे वाहत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याने अक्षरशः लाज आणली आहे. गुन्ह्याचा तपासाचा नवाच फंडा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शोधला आहे. तपासासाठी बाहेरगावी जायचे आहे, असे सांगून फिर्यादीच्या खिशाला कात्री लावायची आणि मौजमजा करायची! गुन्ह्याचा तपास लागला काय अन् नाही लागला काय! विचारतोय कोण! रांजणगाव शेणपुंजी येथील एका चोरीच्या तपासासाठी पोलीस फिर्यादीच्या पैशावर जबलपुरात गेले, तेथे पोहे, जिलेबी खात बसले! जबलपुरात पोलीस जिवाची चैन करत असताना इकडे फिर्यादीने चोरही शोधला, मुद्देमालही हस्तगत केला!
रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर जितेंद्र शांताराम साळुंखे यांचे इंडस्ट्रियल मटेरियल सप्लायचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी सात वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या दुकानदाराने त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले असल्याची माहिती दिली. जितेंद्र साळुंखे यांनी दुकानात धाव घेतली तेव्हा मोठ्या प्रमाणावर किमती साहित्याची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी वाळूज पोलिसांशी संपर्क करून फिर्याद दिली. प्रत्यक्ष मोजदादमध्ये दुकानातून ४३ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
सुतावरून स्वर्गाची सैर
चोरीचा तपास सुरू झाल्यावर पोलिसांना एका संशयिताचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यात जबलपूरचा उल्लेख आल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी जबलपुरला जाण्याची तयारी दाखवली. प्रश्न होता पैशांचा. त्यासाठी जितेंद्र साळुंखे यांच्या खिशाला कात्री लावण्यात आली. मुद्देमाल लाखोंचा असल्यामुळे साळुंखे यांनीही नाईलाजाने जबलपुरला जाण्यासाठी सगळी सोय करून दिली. पोलिसांचे पथक जबलपुरला धडकले. फिर्यादीच्या पैशावर पोहे, जिलेबी खात बसले. चोरही सापडले नाहीत आणि मुद्देमालही गावला नाही. जिवाची चैन करून हात हलवत हे पोलीस पथक परतले.
मौजमजा करून हात वर केले
जबलपुरहून परत आल्यानंतर जितेंद्र साळुंखे यांनी तपासाबद्दल विचारणा केली असता पोलिसांनी तपास चालू असल्याचे सांगून हात वर केले. तपासाच्या नावाखाली पोलिसांनी आपल्याला गंडवल्याचे लक्षात आल्यानंतर जितेंद्र साळुंखे यांनी स्वतःच चोरीचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच त्यांच्या व्यवहाराशी संबंधित एका जणावर त्यांना संशय होता. त्याला विश्वासात घेऊन त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्याने इतर दोन साथीदारांची नावे आणि मुद्देमाल कुठे लपवून ठेवला याची माहिती दिली.
पोलिसांची तत्परता, तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल
जितेंद्र साळुंके यांनी चोरी झाली त्या दिवशीच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी वाळूज पोलीस एवढे कार्यक्षम की, त्यांनी तब्बल तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्याकडे तपास सोपवला.
काखेत कळसा अन् जबलपुरला वळसा!
ज्या चोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी जिवाचे जबलपूर केले ते चोर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या नाकासमोरच फिरत होते. जितेंद्र साळुंखे यांनी संशयिताला घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा मंदिराचा परिसर गाठला. तेथे चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवण्यात आला होता. मुद्देमाल आपल्याच दुकानातील असल्याची खात्री पटल्यानंतर साळुंखे यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीनेच चोर शोधून पोलिसांच्या हवाली केले. शनिवारी या चोरांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने या चोरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



























































