
हमीभावासाठी सरकारने नाफेडकडे बोट दाखवत स्वतःची सुटका केली असली तरी नाफेडकडूनही शेतकऱ्यांची गंडवागंडवीच सुरू आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत थेट बाजारातून कांदा खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात येथे अद्याप नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शासनाच्या घोषणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत असून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने घोषणा करूनही अद्यापही नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकऱयांच्या वाटय़ाला प्रतीक्षाच आली आहे. येथे तत्काळ खरेदी केंद्र सुरू झाल्यास कांद्याला सरासरी 2 हजारांच्या दरम्यान योग्य भाव मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱयांनी व्यक्त केला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात कांदा आवक होते. शनिवारी सुमारे 4 हजार क्विंटल कांदा आवक झाली तरीही नाफेड खरेदीसाठी अद्यापही केंद्र सुरू करत नसल्याने शेतकऱयांना कमी भावाने कांदा विक्री करावा लागत आहे. बाजार समितीत सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला शनिवारी 1612 रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळाला. या दरांमुळे शेतकऱयांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. वाहतूक, मजुरी आणि शेती खर्च वजा जाता हातात काहीच राहत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
नाफेडमार्फत सर्व केंद्रांवर खरेदीची घोषणा झाली असली तरी येथे अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. खरेदी सुरू करण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत. त्यासाठी आवश्यक सर्व सुविधाही देण्याची आमची तयारी आहे. शेतकरी हितासाठी लवकरच खरेदी सुरू करावी.
वसंतराव पवार, सभापती, बाजार समिती
कांदा भाव
किमान – 300
कमाल – 1612
सरासरी -1250
कांदा आवक अंदाजे 4000 क्विंटल


























































