
जोगेश्वरी पूर्वेकडील कोकणनगर येथील मौजे मजास (न.भू. क्र. 175 अ/4 पार्ट) या भूभागावर वसलेल्या झोपडीधारकांचे अखेर पुनर्वसन करण्यात येणार आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न शिवसेनेचे आमदार अनंत (बाळा) नर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुटला आहे. संबंधित झोपडय़ांची पात्रता निश्चित करून त्रिचरण सप्तकार सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे एमएमआरडीएने आमदार नर यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्रिचरण सप्तकार सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) ही झोपडपट्टी 1995 पूर्वीपासून आहे. या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून पुनर्वसन वसाहत निर्माण केली आहे. संबंधित वसाहतीच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झोपडय़ा असून त्या संरक्षित असल्याने त्यांचे एमएमआरडीएच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची विनंती आमदार नर यांनी महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत ठोस पावले उचलली आहेत. त्रिचरण सप्तकार गृहनिर्माण संस्थेच्या झोपडय़ांचे ‘कोमल इंजिनीअरिंग’ संस्थेमार्फत सर्वेक्षण करुन प्राधिकरणातील उपजिल्हाधिकारी/सक्षम प्राधिकाऱ्यांनी पात्र ठरवलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यास महानगर आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी कोमल इंजिनीअरिंगना सुधारित कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यानुसार झोपडय़ांची पात्रता निश्चित करून लवकरच पुनर्वसन करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कोकण नगर येथील झोपडीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला आहे.
तत्कालीन राज्यमंत्र्यांकडून रहिवाशांची दिशाभूल
तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी त्रिचरण सप्तकार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर एसआरए योजना राबवण्याचे आमिष दाखवले होते. त्यांनी रहिवाशांबरोबर सरकारची दिशाभूल केली, असा आरोप आमदार नर यांनी केला. वास्तविक संबंधित झोपडय़ा एमएमआरडीएच्या वसाहतीमधील उद्यानाच्या जागेवर असून 2000 पूर्वीपासूनच्या असल्यामुळे संरक्षित झोपडय़ा आहेत. त्या पुनर्वसनासाठी पात्र आहेत. संबंधित रहिवाशांचे योग्य पुनर्वसन झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आमदार नर यांनी मांडली होती.

























































