
नांदेड-हैदराबाद महामार्गावर नायगाव तालुक्यातील देगाव शिवारात एका ढाब्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर भरधाव दुचाकी आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ही घटना रविवारी, 14 जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
रविवारी रात्री 8 च्या दरम्यान किशन मारोती तुपेकर व सविता कैलास कदम हे दुचाकीवरुन नांदेडकडे जात होते. त्याच दरम्यान डिझेल संपल्यामुळे एक ट्रक्टर पंचवटी धाब्याच्या अलीकडे रोडच्या बाजूला थांबला होता. या उभ्या ट्रक्टरवर भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. रोडच्या बाजूला उभा असलेला ट्रॅक्टर हा सावरखेड येथील होता.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा तर चेंदामेंदा झालाच मात्र मयत किशन मारोती तुपेकर व सविता कैलास कदम यांच्याही शरीरावर गंभीर दुखापती दिसून आल्या. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी व कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयतांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली, पण कुठे न्यायचे याबाबत लवकर निर्णय घेतला नसल्याने तब्बल एक ते दिड तास दोन्ही मृतांचे शव रुग्नवाहिकेमध्येच पडून होते. कुंटूर पोलीस ठाण्याचे बिट प्रमुख कंधारे पुढील तपास करत आहेत.
नांदेड-हैदराबाद हा वर्दळीचा महामार्ग आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बिनदिक्कतपणे मोठमोठी वाहणे व ट्रॅक्टर, ट्रक उभे केले जातात. अनेकदा रिफ्लेक्टर, पार्किंग लाईट नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही व अपघात होतात.


























































