सांगली-सातारा विधानपरिषद, रणांगणात ‘कोट्यधीश’ उमेदवार आमने-सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा राजकीय लढतीसोबतच संपत्तीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप या दोघांनीही निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला असून, दोघेही कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप हे तब्बल 9 कोटी 18 लाख रुपयांच्या मालमत्तेसह आघाडीवर आहेत, तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांची एकूण मालमत्ता 3 कोटी 67 लाख रुपये आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचे दोघेही उमेदवार उद्योजक आणि शेतकरी असून, विशेष म्हणजे कोणावरही एकही गुन्हा अथवा न्यायालयीन खटला प्रलंबित नाही. जगताप यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत तब्बल 4 कोटी 70 लाख रुपयांची वाढ झाली असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न आता 4 कोटी 70 लाख रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे धैर्यशील कदम यांच्या उत्पन्नात 7 लाख 55 हजार रुपयांची घट झाली असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न 4 कोटी 10 लाख 38 हजार रुपये आहे.

कदम यांच्याकडे विविध ठिकाणी शेतीजमिनी, कार, 100 ग्रॅम सोने, 420 ग्रॅम चांदी आणि 50 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आहे. मात्र, त्यांच्यावर जवळपास 2 कोटी 93 लाख रुपयांचे कर्जही आहे. जगताप यांच्याकडे दोन कार, 33 तोळे सोने, मोठ्या प्रमाणावर जंगम मालमत्ता असून, त्यांच्यावर सुमारे 46 लाख रुपयांची देणी आहेत.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक झालेल्या या माहितीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांसोबत उमेदवारांच्या आर्थिक सामर्थ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. राजकीय लढतीसोबतच आर्थिक ताकदीचीही ही निवडणूक ठरत असून, मतदार कोणाला कौल देणार, याकडे आता सांगली आणि सातारा जिह्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.