Ratnagiri News – विहिरीवर लावलेल्या जाळीत अडकलेल्या नागाला सर्पमित्राने दिले जीवनदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरूख येथील मधली आळी (गुरववाडी) परिसरातील दिलीप गोखले यांच्या विहिरीवर लावलेल्या जाळीत सुमारे पाच ते साडेपाच फूट लांबीचा नाग अडकला असल्याची माहिती मिळताच स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे आपत्कालीन अणि क्रीडा विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध सर्पमित्र राजा गायकवाड यांनी आज सकाळी धाडस आणि तत्परता दाखवत विहिरीच्या जाळीत अडकलेल्या नागाला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला जीवनदान दिले.

विहिरीवर संरक्षणासाठी लावलेल्या जाळीत हा नाग अडकून पडला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजा यांनी अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने नागाची सुटका केली.सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यानंतर संबंधित नागाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे एकीकडे नागरिकांचा संभाव्य धोका टळला, तर दुसरीकडे वन्यजीवाचे प्राणही वाचले.

राजा गायकवाड यांनी यापूर्वीही अनेक सापांचे यशस्वीरीत्या रेस्क्यू करून त्यांना जीवनदान दिले आहे. वन्यजीव संवर्धनाबाबतची त्यांची तळमळ, धाडस आणि सेवाभाव यामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत असते. आजच्या या कार्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याची प्रचिती आली असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सर्पमित्र राज गायकवाड यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.