
निलंगा तालुक्यातील पालापूर येथील एका ७० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. हणमंत पाटील (वय ७० वर्ष, रा. पालापूर, ता. निलंगा) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पालापूरसह संपूर्ण निलंगा परिसरात खासगी सावकाराच्या अमानुष पद्धतीवर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते. कमी शेती असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले होते. त्यातच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते घेण्यासाठी पदरी पैसा नसल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून निलंगा शहरातील खासगी हॉस्पिटल समोर पत्नीसह मिळून एक छोटे हॉटेल सुरू केले होते. हे हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते.
हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्ज फिटत नव्हते, उलट खासगी सावकाराच्या व्याजाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच गेला. घेतलेले पैसे आणि अवाजवी व्याज वेळेत परत करू न शकल्याने संबंधित खासगी सावकाराने पाटील यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. जाहीर ठिकाणी शिवीगाळ करणे, धमकावणे आणि सततचा छळ यामुळे हणमंत पाटील कमालीच्या मानसिक दडपणाखाली होते. सावकाराच्या या असह्य त्रासाला कंटाळून शेवटी हणमंत पाटील यांनी दिनांक १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पालापूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत शेतकऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून दिनांक १५ जून रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी पालापूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पश्चात पत्नी, दोन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. या आत्महत्येप्रकरणी संबंधित खासगी सावकारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत असून, निलंगा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





























































