
विजय जोशी, नांदेड
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायब झालेल्या नगरसेवकांचे गूढ अखेर उकलले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी अनेक मतदार नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चा सुरू असतानाच, आज सोशल मीडियावर देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे गायब झालेले नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून थेट गोव्यात तळ ठोकून मौजमजा करत असल्याचे उघड झाले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे १२ ते १३ नगरसेवक गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. एका तेलगू गाण्यावर या लोकप्रतिनिधींनी धरलेला ठेका सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, या सहलीमध्ये काही महिला नगरसेवकांच्या पतींचाही समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष विजयमाला टेकाळे यांचे पती, उपनगराध्यक्ष अंकुश देशमुख, नगरसेवक अनिल बोनलवार, बबलू टेकाळे, मोयोद्दीन आणि संतोष नालावार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी गोव्याच्या बिचवर गाण्यांच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत नगरसेवकांच्या गायब होण्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. सुट्ट्यांचा काळ असल्याने नगरसेवक आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असावेत, असा दावा चव्हाणांनी केला होता. मात्र, आता समोर आलेल्या थेट व्हिडिओमुळे हा कोणताही कौटुंबिक दौरा नसून आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्याच्या घडीला या मतदारसंघातील जवळपास ३०० ते ३५० नगरसेवक आपापल्या शहरातून आणि नगरपालिका क्षेत्रातून गायब असल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. अनेक नगरसेवकांचे फोन सध्या ‘नॉट रिचेबल’ असून, ते देशातील विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकिकडे देगलूर शहरात स्थानिक नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना आणि विकासकामांची गरज असताना, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शहराला वाऱ्यावर सोडून गोव्यात पर्यटनाचा आनंद घेत आहेत. या प्रकारामुळे नांदेड आणि देगलूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून मतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या या कथित ‘बगळातळा’मुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या देगलूरतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक गायब होते. हे नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून थेट गोव्यात तळ ठोकून मौजमजा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. वाचा सविस्तर – https://t.co/6ysMDJUDlD pic.twitter.com/nIYBcFNcdf
— Saamana Online (@SaamanaOnline) June 15, 2026





























































