खराब दुग्धजन्य पदार्थ विकत असल्याचा व्हिडीओ प्रसारित करून खंडणीची मागणी, मुलुंडमधील रिलस्टारला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खराब दर्जाचे पनीर विकता असे धमकावत पनीर विक्रेत्या दुकानाचे व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित करून दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या एका रिलस्टारला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत. रणदीप सिंह गुजराल (40) असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मुलुंड येथील एका व्यावसायिकास समाजमाध्यमावर न्यूज पोर्टल चालविणाऱ्याने अडीच लाखांची खंडणी मागितली होती. तुझ्या दुकानातील पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ खराब असून ते तू विकत असल्याचा खोटा व्हिडीओ आरोपीने बनवला. तो व्हिडीओ आफटरनून न्यूज नावाच्या ऑनलाइन चॅनेलवर प्रसारित करून रणदीपने दुकानदारास खंडणीसाठी धमकावत 50 हजार ऑनलाइन घेतले. त्यानंतर दुकानदाराने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता व युनिट-5 ने पद्धतशीर सापळा रचून रणदीपला दोन लाखांची खंडणी घेताना मुलुंड येथे रंगेहाथ पकडले. या गुन्ह्यात रणदीपची पत्नी व वडील यांचाही समावेश असून ते दोघे पसार झालेत. पोलीस त्यांची पत्नी व वडिलांचा शोध घेत आहेत.