इंधन दरवाढीचा ‘लालपरी’ला फटका; एसटीची आणखी महिनाभर 10 टक्के हंगामी भाडेवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या इंधन खर्चाचा आर्थिक भार पडल्याने एसटी महामंडळाने आणखी महिनाभरासाठी तिकीट दरावरील 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने या भाडेवाढीच्या मुदतवाढीची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ‘लालपरी’तून प्रवास करताना दरवाढीची झळ बसणार आहे.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या 10 टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महामंडळातर्फे सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार एसटीच्या साध्या बस सेवांचे वाढीव भाडेदर आता 15 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून साध्या बससेवांच्या भाडय़ात 10 टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत 15 जून 2026 रोजी संपुष्टात येणार होती.

आगाऊ आरक्षण केलेल्यांकडून फरक वसूल करणार

ज्या प्रवाशांनी नियोजित प्रवासाचे आगाऊ आरक्षण केले आहे आणि त्यांचा प्रवास 16 जून 2026 किंवा त्यानंतर होणार आहे, अशा प्रवाशांकडून जुन्या आणि नवीन तिकीट दरामधील फरक बसमधील वाहकाद्वारे वसूल केला जाईल, असे एसटी महामंडळाच्या परिपत्रकात म्हटले आहे.