
कल्याण पूर्वेतील वालधुनी उड्डाणपूल कामासाठी केडीएमसीने ३० मे रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेतील बांधकामे तोडली होती. या निषेधार्थ भिक्खू संघाने पालिका मुख्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले. यावेळी बुद्धभूमीची जमीन आमच्या हक्काची… नाही कोणाच्या बापाची, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी पालिका मुख्यालय परिसर दणाणून सोडला.
बुद्धभूमीच्या जमिनीचे संरक्षण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी या वेळी भिक्खू संघ आणि कल्याण बुद्धभूमी फाउंडेशनने केली. केडीएमसीतील काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला.
बुद्धभूमी कारवाईचे सूत्रधार श्रीकांत शिंदे
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे बुद्धभूमी कारवाईचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप भन्ते महाथेरो गौतम रत्न यांनी केला. श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे अभिषेक थोरवे यांना ४०० ते ५०० कोटींचे उड्डाणपूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या कामातून त्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून बुद्धभूमी फाउंडेशनला उद्ध्वस्त करून नंतर ही जमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या षडयंत्राला स्थानिक पोलीस पाठिंबा देत असल्याचा आरोपही गौतम रत्न यांनी या वेळी केला.




























































