
गुजरातमधील भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाचा सोमवारी उद्रेक झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व पोलिसांकरवी त्यांची आंदोलने दडपणाऱ्या भाजप सरकारविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. कर्जमाफी करा, शेतमालाला योग्य भाव द्या आणि विजेच्या खांबांसाठी होणारे भूसंपादन ताबडतोब थांबवा, या मागण्या करत शेतकऱ्यांनी अहमदाबाद ते गांधीनगर अशी जबरदस्त ट्रक्टर रॅली काढली. हजारो शेतकरी 1,111 ट्रक्टर आणि जेसीबी घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. अहमदाबादच्या शांतिपुरा येथून निघालेली ही रॅली गांधीनगरपर्यंत गेली. राज्यातील विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी या यात्रेला पाठिंबा दिला. ‘गुजरातमध्ये नवे इंग्रज राज्य करत आहेत, मात्र हा गांधी-सरदारांचा गुजरात आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्याविरोधात आवाज उठणारच,’ असा इशारा आंदोलकर्त्यांनी सरकारला दिला.





























































