
‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर शिवसेनेच्या संकल्पनेतून मुंबईत घरकाम, असंघटित क्षेत्रात काम करणाऱया महिलांसाठी ‘स्वाभिमान निधी योजने’ अंतर्गत अर्थसहाय्य योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडे पाठवलाही आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या वतीने घरकाम करणाऱया महिलांसाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली आहे. महागाई, वाढता घरखर्च आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर महिलांना अधिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे. त्यानुसार सभागृहनेते गणेश खणकर यांच्याकडेदेखील लेखी विनंती प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास सभागृहनेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे..
मंजुरीनंतर लाभार्थींची पात्रता निश्चिती
असंघटित क्षेत्रातील उदरनिर्वाह करणाऱया अथवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या महिलांना अधिक आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर लाभार्थींची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्ष नेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी दिली.




























































