बोगस पदवी दाखवून दुय्यम अभियंता 14 वर्षे करतोय महापालिकेची नोकरी! दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत बोगस स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेला एक दुय्यम अभियंता तब्बल १४ वर्षे पालिकेत नोकरी करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. धर्मराज दावणे असे या दुय्यम अभियंत्याचे नाव असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

या बोगस पदवी प्रकरणामुळे पालिकेच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालिकेच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना चौकशीसाठी निवेदन दिले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित दुय्यम अभियंत्याला सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्वांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लक्षवेधीतून माहिती

लक्षवेधी सूचनेस दिलेल्या उत्तरानुसार, संबंधित अभियंत्याने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, नवी दिल्ली’ या खासगी संस्थेचे अभियांत्रिकी पदवीचे प्रमाणपत्र २० मार्च २०२६ रोजी सादर केले आहे. ही संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) अथवा भारत सरकार मान्यताप्राप्त अभियांत्रिकी विद्यापीठ नाही. तसेच सदर प्रमाणपत्र पालिकेच्या जाहिरातीतील आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करत नाही.