
पुणे शहराला भविष्यात पुरात लोटणाऱया पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहेत. पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पुण्यात भयंकर पूरस्थिती निर्माण होऊन पुणे पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पातील पर्यावरणीय मंजुरीच्या अटींचे उल्लंघन, नदीपात्राची कमी करण्यात येणारी रुंदी आणि त्यामुळे पुणेकरांवर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरधोक्याबाबत आदित्य ठाकरे यांनी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र दिले होते.
17 मे 2026 रोजी पर्यावरणवादी सारंग यादवाडकर यांनी या प्रकल्पासंदर्भात सादर केलेले पत्रही आदित्य ठाकरे यांनी त्यासोबत जोडले होते. संबंधित समितीची पाहणी व तांत्रिक भेट होण्यापूर्वीच प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात येत असल्याचे समजते. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त होण्यापूर्वी काम पुढे नेल्यास भविष्यात पुणे शहर व पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रकल्पातील तांत्रिक, पर्यावरणीय व कायदेशीर बाबींची सखोल तपासणी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे समितीचा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत सदर प्रकल्पाच्या कामास तत्काळ स्थगिती देण्यात यावी तसेच अहवालातील निरीक्षणे, शिफारशी व तज्ञांचे मत विचारात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या लढय़ाला यश आल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
ही आपल्यासाठी तसेच पर्यावरणप्रेमींसाठी यशाची पहिली पायरी असली तरी यापुढेही हा विषय तडीस नेण्यासाठी आम्ही ठाम प्रयत्न करत राहू.


























































