सोबत असतात त्यांच्यावर अंधविश्वास ठेवतो! आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo - चंद्रकांत पालकर

जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, पण आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच जनतेने मशालीला कौल दिला आहे आणि हा विश्वास कधीही तुटणार नाही. जे मशालीच्या चिन्हावर जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत घट्ट उभे आहेत, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी आणि संसदेत दोन तृतीयांश बहुमतासाठी विरोधी पक्ष फोडणे, चिन्हे आणि नावे चोरणे हा भाजपचा गलिच्छ डाव असल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेच्या वतीने आयोजित पुणे शहर व जिल्हा बी.एल.ए. यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काही खासदार प्रत्यक्ष तर काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. जे मशालीच्या चिन्हावर जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत घट्ट उभे आहेत. शिवसेनेचे सात खासदार संपर्कात असल्याच्या कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे यांनी खरपुस समाचार घेतला. त्यावेळी लोकसभेला ते कसे जिंकले, कसा आम्ही प्रचार केला वगैरे, त्याच्यात मला जायचे नाहीये. कृपाल तुमाने यांना एवढंच सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा.

विविध राज्यांमध्ये खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सगळी अहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दीदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदललं की टुपूक-टुपूक उड्या मारून पळतायत. शिवसेनेची केस जवळपास आता चार-साडेचार वर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढेच वर्ष सुरू आहे. तसे पाहायला गेले तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे. मात्र, एखादा पक्ष असा फुटून, चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, या सरन्यायाधीश यांच्या विधानाशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. सध्या देशात तशी स्थिती दिसत आहे काय ? आपली लोकशाही डिस्ट्रॉय होतेय का? यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. भाजपचे हे गलिच्छ राजकारण केवळ पक्षांना नव्हे, तर देशाच्या संविधानाला घातक ठरत आहे.

सरकार जनतेचे प्रश्न सोडवणार का?

2014 साली अच्छे दिन आयेंग असे सांगत सत्तेत आले. त्यावेळी ते भविष्याबाबत आश्वासन देत होते. आता ते भूतकाळ उकरून काढत आहोत. सरकार आणि सत्ताधारी पक्ष राजकारणापलीकडे जात जनतेने प्रश्न सोडवणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. महागाई, पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या समस्या यामुळे जनतेत रोष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे विषय मांडत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

आम्ही विनाअट कर्जमुक्त केले

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, तो गुन्हेगार नाही, त्यामुळे त्याच्यावर उपकार केल्यासारखी क्लिष्ट अटींची कर्जमाफी देणे ही त्यांची थट्टा आहे. आमच्या काळात कोणतीही तांत्रिक अट न लावता शेतकऱ्यांना थेट दोन लाखांपर्यंत कर्जमुक्त केले गेले होते. सध्याचे सरकार केवळ थातूरमातूर घोषणा करून स्वतŠची पाठ थोपटून घेत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, पुणे सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे, शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते नितीन गावडे, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे आदी उपस्थित होते.