
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी गर्दी केली होती. दीड वर्षाने अधिक मासात आलेल्या सोमवतीला राज्याच्या विविध भागांतून मोठ्या श्रद्धेने भाविक जेजुरीत दाखल झाले होते. या वेळी भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण केली. ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने सारा गड दुमदुमला. मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. वाघ्या-मुरळ्यांच्या संबळ व टिमकीच्या आवाजात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष सुरू होता. श्री मार्तंड देवसंस्थानने खांदेकरी व मानकऱ्यांसाठी अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था केली होती. आवश्यक तेथे प्रखर प्रकाशझोताचे दिवे लावण्यात आले होते.




























































