
अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती एकता समितीच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येत्या 26 जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर महामोर्चा धडकणार आहे.
अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या विचारात सरकार आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीने या संदर्भात शासनाला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध न करताच त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या. यावर 50 हजारांवर सूचना व हरकती आल्याचे सांगण्यात आले आहे. अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जाती येतात. राज्य सरकारने उपवर्गीकरण करण्यासंदर्भात केवळ एका जातीचे प्रतिनिधी सोडून 58 जातीच्या प्रतिनिधींशी कुठलीही चर्चा न करता उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केली. उपवर्गीकरण करण्याबाबत बार्टीने दिलेला अहवाल तसेच बदर समितीने दिलेला अहवाल हा 58 जातीवर अन्याय करणारा आहे. तसेच शासनाचे उपवर्गीयकरण करण्याचे शासन धोरण हे जाती जातीत संघर्ष करण्याचे आहे.
बीड ते मुंबई लाँग मार्च
मुंबईतील मोर्चासाठी मराठवाड्यातील बीड येथून लाँग मार्च काढण्यात आला आहे. या मार्चमध्ये विविध जिल्ह्यांतून लोक सहभागी होत आहेत. 26 जून रोजी महा लाँग मार्च मुंबईत पोहोचेल. त्यानंतर मुंबईत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.






























































