पाणीटंचाईचे संकट गडद; आठवड्यानंतर 20 टक्के पाणीकपात? सात तलावांत फक्त 10 टक्के जलसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांनी तळ गाठला असून अवघे १० टक्के पाणी शिल्लक आहे. त्यातच मान्सून आणखी लांबणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे तलाव भरेपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात पुढील आठवड्यापासून २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा १५ जून रोजी सातही धरणांत फक्त १ लाख ५५ हजार १६७ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक राहिल्यामुळे, १५ मेपासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या २ लाख ३० हजार ५०० दशलक्ष (मिलियन) लिटर राखीव जलसाठ्यावर मुंबईच्या पाणीपुरवठ्याची मदार आहे.

पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी वापरल्यास कारवाई

पिण्याच्या पाण्याचे संभाव्य संकट पाहता पिण्याचे पाणी बांधकामासाठी, स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यासाठी वापरल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पाण्याचा अयोग्य वापर आणि पाणीपुरवठ्याचे आगामी नियोजन यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. यामध्ये जलसाठा पाहून पाणीकपात आणखी १० टक्क्यांनी वाढवण्याचा पालिकेचा विचार आहे.