भाजपने मुंबई विमानतळात माफिया घुसवलेत, त्यांच्याशी लढावेच लागेल! संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या सत्तेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत संपूर्ण राष्ट्रच आता माफियांच्या ताब्यात गेलेय. याआधी आम्ही विमानतळावर कधी माफियागिरी पाहिली नव्हती, मात्र भाजपने आता थेट त्यांचे माफियाच मुंबई विमानतळात घुसवले आहेत. विमानतळात युनियन असलेल्या भाजपचेच पदाधिकारी स्मगलिंग करीत आहेत. याला सरकारचाच पाठिंबा आहे. या प्रवृत्तीशी आपल्याला लढावेच लागेल, असा घणाघात आज शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.

भारतीय कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात संजय राऊत बोलत होते. भाजप युनियनच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या घुसखोरीचा त्यांनी समाचार घेतला. विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिरवणाऱ्या युनियनच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विमानतळाचा स्मगलिंगचा अड्डाच बनवला आहे. उद्या हे पैशांसाठी विमानतळात दहशतवादी घुसवतील, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई विमानतळावर सोळंकीसारखे गुंड आमच्या कामगारांना धमकावतात. हे आम्हाला नाही तर मुंबई पोलिसांना आव्हान आहे, असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते-खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते. संघटनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, मयूर वनकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, गोविंद राणे, जीवन कामत, मनोज धुमाळ, सहचिटणीस जगदीश निकम, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, सुजित कारेकर, दिनेश परब, वसंत गुरव उपस्थित होते.

कामगारांना न्याय देणारच!

कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देणारी भारतीय कामगार सेना ही एकमेव संघटना आहे. कर्मचाऱयांना उत्तम पगार, वेतनवाढ, सुरक्षा, नोकरीची शाश्वती यासाठी कामगार सेना सातत्याने लढा देत असल्याचे अध्यक्ष अरविंद सावंत म्हणाले. मला भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ युनिटचा अभिमान वाटतो की, कोणत्याही आमिषाला भुलून ते विकले गेले नाहीत, असे सांगतानाच यापुढेही कामगारांना न्याय मिळवून देणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.