
अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिका याचिकाकर्त्यांनी आज मागे घेतल्या. अपघाताबाबत जोपर्यंत एएआयबीचा अंतिम चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत यासंदर्भात कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, असे हायकोर्टाने स्पष्ट केल्यानंतर या याचिका मागे घेण्यात आल्या.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी हायकोर्टात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. केतन तिरोडकर यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, तर हेमंत पाटील यांनी हा तपास एसआयटीकडे सोपवण्याची, त्याचबरोबर संबंधित विमान पंपनी व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला केली होती. या याचिकांवर आज सोमवारी प्रभारी मुख्य न्यायमर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. मागण्या पूर्ण झाल्याने सध्या या याचिकांची गरज नाही, असे खंडपीठाने स्पष्ट करत त्या फेटाळत असल्याचे सांगितले, तेव्हा या दोन्ही याचिका मागे घेण्यात आल्या.



























































