FIFA World Cup 2026 बेल्जियमच्या मदतीला लुकाकू आला धावून…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलाढय़ बेल्जियमला फुटबॉल वर्ल्ड कपमधील ‘जी’ गटातील सलामीच्या सामन्यात इजिप्तविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. रोमेलू लुकाकूच्या प्रभावी खेळीमुळे बेल्जियमला पराभव टाळता आला.

इजिप्तने 19व्या मिनिटाला आघाडी घेतली. मोहम्मद सलाहच्या अचूक पासवर इमाम आशूरने 20 यार्डवरून शानदार फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला. आशूरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा पहिलाच गोल ठरला. या गोलमुळे इजिप्तने पहिल्या सत्रात बेल्जियमवर दबाव निर्माण केला.

बेल्जियमचा गोलरक्षक थिबॉ कुरतोआने काही महत्त्वपूर्ण बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. दुसरीकडे, इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबीरलाही पहिल्या सत्रात फारशी कसोटी द्यावी लागली नाही.

दुसऱ्या सत्रात बेल्जियमने आक्रमणाची धार वाढवली. 66व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या रोमेलू लुकाकूने अवघ्या 28 सेकंदांत सामन्याचे चित्र बदलले. थॉमस मेउनियरच्या क्रॉसवर झेपावताना त्याने निर्माण केलेल्या दबावामुळे इजिप्तचा बचावपटू हानीकडून आत्मघातकी गोल झाला आणि बेल्जियमने बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्न केले, मात्र निर्णायक गोल झाला नाही.