पडद्याआडून – ‘शिक्कामोर्तब’ होत नाही, हेच खरं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांची परंपरा समृद्ध आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवत असतानाही त्यांच्या मनात एखादा गंभीर विचार रुजवण्याची ताकद या प्रकारात असते. ‘शिक्कामोर्तब’ हे नाटकही अशाच सजग उद्देशाने रंगभूमीवर आले आहे. कौटुंबिक नातेसंबंध, अहंकार, गैरसमज, सामाजिक मान्यतेची मानसिकता आणि मानवी स्वभावातील विसंगती यांचा वेध घेण्याचा कसोशीचा प्रयत्न या नाटकात करण्यात आला आहे.

आर्यन भोसले आणि शर्मिला भोसले हे एक आधुनिक जोडपं आहे. दोघंही पेशाने वकील असले तरी ‘ती’ त्याच्यापेक्षा जास्त बिझी. त्यामुळेच घरातल्या कामांची जबाबदारी त्याच्यावर आणि म्हणून एक पुरुष म्हणून त्याची घुसमट होतेय. कधीतरी छोटय़ा-मोठय़ा कुरबुरींमुळे त्याचा स्फोट होतो खरा, पण तसं ठीकठाक सुरू आहे. अचानक त्या दोघांकडे घटस्फोटाची एक केस येते. मजनू हलधर आणि लैला हलधर या बंगाली जोडप्याला घटस्फोट हवाय व योगायोगाने मजनूचा वकील आर्यन, तर लैलाची वकील शर्मिला अशी विभागणी झाली आहे. लैलाची आधी तीन लग्ने झालीत आणि चौथे लग्न तिने मजनूशी केलेय ही गोष्ट उघड झाल्यानंतर आता मजनूला घटस्फोट हवा असतो. आर्यन आणि शर्मिला दोघेही आपापल्या परीने ही केस लढवायला सिद्ध होतात आणि मग पुढे…

त्यानंतर या चार प्रमुख पात्रांभोवती ही कथा हळूहळू उलगडत जाते. त्यांच्या नात्यांमधील ताणतणाव, संशय, इगो आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यांना विनोदी अंगाने सादर करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक प्रमोद विठ्ठल शेलार यांनी केला आहे. मात्र कथानकातील मूळ संघर्ष उभा राहत असतानाच त्यावर विनोदाचे इतके थर चढवले जातात की, त्यात विषयाचे गांभीर्यच विरघळून जाते. भाषिक कोट्या, पीजे आणि कृत्रिम विनोदांची सततची पेरणी कथेला पुढे नेण्याऐवजी तिची गती खुंटवते. बंगाली भाषेतील शब्दांचे मराठी अन्वयार्थ लावण्याच्या नादात मराठीचीही गळचेपी झाल्याचे जाणवते आणि प्रेक्षक भांबावतो. नाटकाचा बराचसा भाग कौटुंबिक न्यायालय आणि वैवाहिक नातेसंबंधांभोवती फिरतो. न्यायालयीन घडामोडींचे सादरीकरण पुरेशा अभ्यासाअभावी विस्कळीत वाटते. त्यामुळे कथानकाला आवश्यक असलेली विश्वासार्हता निर्माण होत नाही. स्पॉयलर टाळण्यासाठी इथे काही गोष्टींचा उल्लेख करता येत नाही.

अभिनयाच्या बाबतीत कलाकारांनी आपापल्या परीने यथास्थित प्रयत्न केले आहेत. सागर कारंडे यांची रंगमंचावरील उपस्थिती आणि टायमिंग अनेक प्रसंगांमध्ये उठून दिसते. ‘बिग बॉस मराठी’नंतर पुन्हा रंगभूमीकडे वळलेल्या सागरकडून अपेक्षा मोठय़ा आहेत आणि त्याची झलकही काही ठिकाणी दिसते. मात्र कमकुवत लेखनामुळे त्यांच्यासह इतर कलाकारांची क्षमता पूर्णपणे खुलत नाही. विशेषतः भक्ती रत्नपारखी यांच्यासारख्या विनोदाची ताकद असलेल्या सहजसुंदर अभिनेत्रीला नाटकात पुरेसा वाव मिळालेला नाही. त्यांना चांगली साथ दिलीय ती कांचन पगारे आणि स्नेहा पराडकर यांनी. स्नेहा पराडकर दोन दिवसांच्या तालमीत रंगमंचावर उभ्या राहिल्या आणि त्यांनी ती भूमिका व्यवस्थित निभावून नेलीय. त्याबद्दल त्यांचे, दिग्दर्शक प्रमोद शेलार आणि टीमचे विशेष कौतुक.

नाटकाच्या तांत्रिक बाजू मात्र छान जमून आल्या आहेत. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आखीव, देखणे आणि प्रसंगानुरूप झाले आहे. घर आणि न्यायालय या दोन ठिकाणी हे नाटक घडते. त्यांची मांडणी सुटसुटीत आहे आणि त्याला शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेची उत्तम साथ लाभली आहे. दृश्यरचना आणि रंगमंचीय मांडणी नाटकाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतात. अभिजीत पेंढारकर यांचे संगीतही आवश्यक ती रंगत आणते.

उच्चार आणि बोलीची हाताळणी यांमध्ये सातत्य नाही. परिणामी पात्रांची ओळख ठसठशीत होत नाही. विनोदाच्या नावाखाली घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे व्यक्तिरेखांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच विकसित होत नाही आणि पात्रे केवळ प्रसंगनिष्ठ बाहुल्यांसारखी वाटू लागतात. यामुळे मुख्यतः कांचन आणि भक्ती यांच्या व्यक्तिरेखांवर अन्याय झाल्यासारखे वाटते. प्रयोग अजून कसदार व्हायला हवाय.

‘शिक्कामोर्तब’चा विषय महत्त्वाचा आहे. समाजाच्या ‘शिक्कामोर्तब’ मानसिकतेवर आणि नातेसंबंधांतील गुंतागुंतीवर भाष्य करण्याची त्यात क्षमता आहे. मात्र सशक्त लेखन, संयत विनोद आणि अधिक परिपक्व दिग्दर्शनाच्या काहीशा अभावामुळे ही क्षमता पूर्णत्वाला जात नाही. हसवण्याच्या नादात विचार हरवून बसलेले हे नाटक रंगतदार मनोरंजनाचा प्रयत्न करते, पण प्रेक्षकांच्या मनावर कायमचा शिक्का उमटवण्यात कमी पडते.

  • लेखन आणि दिग्दर्शन – प्रमोद शेलार
  • कलाकार – भक्ती रत्नपारखी, स्नेहा पराडकर, कांचन पगारे आणि सागर कारंडे
  • नेपथ्य – संदेश बेंद्रे
  • प्रकाश – शीतल तळपदे
  • संगीत – अभिजीत पेंढारकर
  • निर्माते – पल्लवी देशपांडे
  • निर्मिती प्रमुख – महेंद्र खराडे
  • छायाचित्र सौजन्य – संजय पेठे