
मुंबईत सध्या सादर होत असलेला ‘गालिब हमे न छेड’ हा आगळावेगळा संगीतमय कार्यक्रम रसिकांना उर्दू शायरीच्या अद्भुत विश्वात नेऊन सोडतो. प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांच्या जीवनप्रवासासह त्यांच्या गझला, शायरी आणि तत्कालीन सांस्कृतिक वातावरणाचा वेध या कार्यक्रमातून प्रभावीपणे घेण्यात येतोय. यात सर्व मराठी भाषिक मंडळी अस्सल हिंदी-उर्दूत कार्यक्रम पेश करतात आणि रसिकांची वाहवा मिळवतात.
लेखक-दिग्दर्शक समीर सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात निवेदन, गायन, संगीत आणि दृश्यात्मक मांडणी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. प्रसाद आठल्ये आणि समीर सामंत यांच्या ओघवत्या निवेदनामुळे गालिबचे व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर जिवंत होते, तर सुरेल सादरीकरणामुळे उर्दू भाषा पूर्णपणे न कळणाऱ्या प्रेक्षकांनाही कार्यक्रमाशी सहज नाते जोडता येते. अजित दीक्षित यांच्या निर्मितीतील हा कार्यक्रम गालिबप्रेमींसाठी पर्वणी ठरत असून, उर्दू शायरी समजून घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक रसिकाने आवर्जून अनुभवावा असा आहे. ‘सुखन’नंतर शायरीकेंद्रित आणि वेगळ्या वाटेवरचा आशयघन कार्यक्रम म्हणून ‘गालिब हमे न छेड’ विशेष लक्ष वेधून घेत आहे. मुंबई आणि पुण्यात या कार्यक्रमाचे शो आयोजित केले जात आहेत.



























































