
मतदारांचा व शिवसैनिकांचा विश्वासघात करणाऱ्या गद्दारांविरोधात महाराष्ट्रात असंतोषाची मशाल पेटली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्व सहा गद्दारांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी थेट संवाद सुरू केला असून आज पहिल्या दिवशी त्यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील शाखांना भेटी दिल्या. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिवसैनिक व नागरिकांची यावेळी अलोट गर्दी उसळली. फुटीर संजय दिना पाटील यांच्या विरोधात भांडुप, घाटकोपरमध्ये प्रचंड जनक्षोभ पाहायला मिळाला. ‘या गद्दाराचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… साहेब फक्त आदेश द्या…’ अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. विश्वासघाताचा सूड घ्यावाच लागेल, तयारीला लागा,’ अशी साद उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली. उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईत भांडुप आणि घाटकोपर येथे शाखांना भेट दिली. यावेळी सभेसारखी प्रचंड गर्दी उसळली.
अमित शहा यांची जाहीर चंपी; शिवसेना कोणाची हे कुणी उपटसुंभ, उपरा ठरवू शकत नाही!
‘शिवसेना शिंदेंची आहे आणि शिंदे हे शिवसेनाप्रमुख आहेत असे वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर चंपी केली. त्यांनी अमित शहा यांना ‘उपटसुंभ’ आणि ‘उपरा’ अशी उपमा दिली. ‘शिवसेना कोणाची हे कुणीही उपटसुंभ आणि उपरा ठरवू शकत नाही. शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेबांची आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी शहांना ठणकावले.
सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवता. साध्या कॉक्रोचने तुमची मस्ती उतरवलीय. त्यांची सदस्य संख्या भाजपपेक्षा जास्त झालीय. कुठे आहे तुमचा मोठा पक्ष. झुरळाच्या मिशा तुमच्या दाढीपेक्षा लांब झाल्यात. हा असंतोषाचा उद्रेक आहे.
उद्धव ठाकरे यांनी रविवारी भांडुप येथील शिवसेना शाखा क्रमांक 114 आणि घाटकोपर येथील शाखा क्रमांक 126 ला भेट दिली. तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. भांडुप पश्चिमेकडच्या गाढव नाका येथील साईविहार मार्गावरील शिवसेना शाखेजवळ त्यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले.
खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का?
उद्धव ठाकरे यांनी या वेळी संजय दिना पाटील यांचा समाचार घेतला. ‘‘भाजपसोबत आमची युती असताना ईशान्य मुंबईची जागा भाजपकडे होती. शिवसैनिकांच्या कामामुळे भाजप ही जागा जिंकायचा. शिवसैनिक सतत याबद्दल तक्रारी करायचे. मात्र युती असल्यामुळे आम्ही त्यांनी दिलेले एकेक पार्सल दिल्लीला पाठवायचो. महाविकास आघाडी झाल्यानंतर ही जागा आम्ही मागून घेतली. पैशाच्या धबधब्याला टक्कर देऊन शिवसैनिकांनी ही जागा पहिल्याच प्रयत्नात निवडून आणली. मात्र गद्दाराने त्याची जाणीव ठेवली नाही. आम्हाला दोष देऊन निघून गेलेला हा खासदार शिवसैनिकांना भेट देत नव्हता. कार्यक्रमांना जात नव्हता. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. शिवसैनिकांनी कष्ट केले नसते तर हा खासदार झाला असता का? मी उमेदवारी दिली नसती तर खासदार झाला असता का? आणि खासदार झाला नसता तर याला ‘हमीभाव’ मिळाला असता का? तुम्ही पक्षाचा आदेश पाळला आणि त्याचा दुरुपयोग हे गद्दार करतायत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिंदेंना आमदार, मंत्री मीच केल्याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.
उपऱ्याने औकातीत राहावे!
‘भाजपमध्ये कोणीही सोम्या-गोम्या अध्यक्ष होऊ शकतो. आजही त्यांच्या अध्यक्षाचे नाव कोणाला माहीत नाही. कोणालाही उचलायचे आणि अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवायचे ही त्यांची पद्धत असेल. शिवसेनेत तसे नाही. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख हे एकच पद आहे. दुसरे शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट होणे नाही. लोक स्वीकारणारच नाहीत. पण उपऱ्यांना ते कळणार नाही. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी, भूमिपुत्रांसाठी झाली आहे. त्या शिवसेनेचा प्रमुख कोण हे कोणी उपरा ठरवू शकत नाही. त्यांनी औकातीत रहावे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ‘‘अमित शहांच्या बुडाखाली खुर्ची आहे म्हणून आज लोक त्यांना घाबरतात. पण आम्हाला कोणाच्या सुरक्षेची गरज लागत नाही. आई जगदंबेनं दिलेलं शिवसैनिकांचं कवच माझ्याकडं आहे. मी जनतेत फिरू शकतो, तसे उपरे फिरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचं घर सांभाळावं,’’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘तुम्हाला पंतप्रधान पदाची स्वप्नं पडत असतील आणि म्हणून दुसऱ्याचे खासदार पह्डून स्वतःचा खुंटा बळकट करत असाल तर आधी तुमच्या खुंटय़ाला मुळं आहेत का बघा,’ असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.
याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार सुनील राऊत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, विभाग संघटिका रश्मी पहुडकर, विक्रोळी उपविभागप्रमुख शेखर जाधव, युवा सेनेचे आकाश रोडे, माजी नगरसेविका हेमलता सुकाळे, घाटकोपर येथील शाखा भेटीवेळी विभागप्रमुख सुरेश पाटील, मनसेचे दशरथ शिर्पे तसेच दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
सूड घ्यावाच लागेल
‘भाडय़ाने गाडी मिळेल, दाढी मिळेल, खुर्ची मिळेल, पण जिवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत, ती शिवसेनेत आहेत. दुसरा कुठला पक्ष असता तर गळपटून गेला असता. पण तुम्ही डगमगडला नाहीत. आज इथे आलात. तुमच्या मनात एक आग, शल्य आहे. विश्वासघात झाल्याची भावना आहे. या विश्वासघाताचा सूड निवडणुकीत घ्यावाच लागेल,’ असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
हिंमत असेल तर ईशान्य मुंबईची जागा मिंधेंना सोडा!
शिवसेनेने गद्दारांना काय कमी केले होते? तरीही इकडून तिकडे गेले. काय मिळवणार आहात? आता ईशान्य मुंबईची जागा भाजप मिंधेंना सोडेल का? हिंमत असेल तर भाजपने तसे जाहीर करावे, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.
































































