
‘एल निनो’मुळे यंदा पाऊस लांबला आहे. राज्यात मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातल्या धरणांमधील जलसाठा 24 टक्क्यांवर आला आहे. कमी पाऊस चिंतेची बाब आहे. पाण्याचे दुर्भिक्ष झाले तर खूप मोठे संकट राज्यावर उभे राहू शकते, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारच्या वतीने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
56 लाख शेतकऱ्यांना फायदा
शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी 33 हजार 585 कोटी रुपये दिले. त्याचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला.
अपुऱ्या पावसाच्या संदर्भात चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कमी पावसामुळे सध्या अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा 80 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोकणात तर सरासरीपेक्षा 86 टक्के कमी पाऊस पडला आहे. काही जिह्यांमध्ये तर पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.
कोकणात 23 जूनपासून पाऊस
कोकणात 23 जूनपासून पाऊस जोर पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ-मराठवाडय़ात कमी ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पेरणी लायक पाऊस पडण्याची शक्यता नाही. 100 मिमी पाऊस जमिनीत जातो तेव्हा पेरण्या करणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पाणी उपाशावर बंदी
राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 24 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी उपशावर बंदी घातली आहे. पण त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिलांना शेतकरी दर्जा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दहा विधेयके मांडण्यात येणार आहेत. त्यात महिला शेतकरी दर्जा विधेयक आहे. राज्यात शेती करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, पण त्यांना कायदेशीर दर्जा नाही. त्यामुळे महिलांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांना कायदेशीररीत्या शेतकरी दर्जा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन यशस्वी-बॉडी सुखरूप
शिवसेना खासदारांच्या गद्दारीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच भाष्य केले. खासदारांच्या बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते. पण आजच्या पत्रकार परिषदेत खासदारांच्या गद्दारीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑपरेशन यशस्वी झाले, बॉडी सुखरूप आहे.
































































