फक्त दोन मिनिटे उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, मुंबईत परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ; पालकांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपर फुटल्यानंतर रद्द झालेली ‘नीट-यूजी’ परीक्षा आज पार पडली. अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत फेरपरीक्षा झाली. अगदी एक किंवा दोन मिनिटांनी उशिरा पोहोचणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. मुंबईसह अनेक शहरांमधील केंद्रांवर असे प्रकार घडले. या प्रकारामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबईत परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात नीट फेरपरीक्षेचे केंद्र होते. पेपरफुटीमुळे टीकेची धनी झालेल्या एनटीएने यावेळी कठोर नियमावली जाहीर केली आहे. त्याचा फटका या केंद्रावर आलेल्या दोन विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत प्रवेश देण्यात आला. मात्र, हे विद्यार्थी अवघे दोन मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, नियमांवर बोट ठेवून एनटीएच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. परीक्षा देता न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रडू आवरता आले नाही. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची कठोर सुरक्षा तपासणी करण्यात आली. विद्यार्थिनींना कानातले घालून जाण्यास मनाई करण्यात आली होती. ते काढल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. काही केंद्रांवर विद्यार्थिनींच्या कानातले कापण्यात आले. त्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चपलादेखील तपासण्यात येत होत्या. कोटा येथे एक विद्यार्थी चक्क बनियान आणि बर्म्युडा घालून परीक्षा देण्यासाठी पोहोचला. विद्यार्थ्यांचे चष्मेदेखील तपासण्यात येत होते.

30 सेकंदांचा विलंब आणि वर्ष गेले वाया

मध्य प्रदेशातील भोपाळ आणि छतरपूर येथे काही विद्यार्थी चुकीच्या केंद्रावर पोहोचले. योग्य केंद्रावर पोहोचेपर्यंत एका विद्यार्थ्याला उशीर झाला. असाच प्रकार एका विद्यार्थिनीसोबत घडला. भोपाळच्या सरोजिनी सुभाष विद्यालय येथील केंद्रावर अवघ्या 30 -40 सेकंदांच्या विलंबामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. केंद्रावर योग्य व्यवस्था नव्हती, त्यामुळे खोली क्रमांक शोधण्यात वेळ गेला, असा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला. या प्रकारामुळे केंद्रावर बराच गोंधळ निर्माण झाला होता.

वर्ष वाया गेले

मुंबईशिवाय बंगळुरू येथेही 4 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी धावतपळत परीक्षा केंद्र गाठले. मात्र, उशीर झाल्यामुळे केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यांनी रेलिंग ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा बंद करण्यात आला होता. या चौघींचे वर्ष वाया गेले आहे. त्या बराच वेळ रडत बसल्या होत्या.