
>>डॉ. मैथिली उमाटे<<
लोकलच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि एकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले. या घटनेने मुंबई हादरली. साध्या गोष्टींनी संतापाचा उद्रेक होऊन हल्ला करण्याच्या घटना वाढत आहे. लोक इतके हिंसक का होत आहेत?
दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून रेल्वेमध्ये मयंक लोहार या 22 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला. वाढत्या संतापातून ही घटना घडली. लोकांचा संयम कमी होतोय. त्यांच्यात नकार पचवायची वृत्ती कमी होतेय. लोक आपल्यापुरते बघताहेत. आपल्याच जगात मग्न राहून इतरांचा विचार करण्यापासून दूर जाताहेत. मोठय़ाने बोलणे, धक्का लागणे यासारख्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून लोक ट्रिगर होत आहेत. यातूनच अशा हिंसक घटना घडू लागल्या आहेत.
कोणत्याही हिंसक वृत्तीचे समर्थन होऊ शकत नाही. पण त्यामागील मानसशास्त्राचा विचार करता येईल. आजची पिढी, विशेषतः जेन झी यांच्यात मला हवेच आहे ही वृत्ती दिसून येते. सरसकट सर्वांबद्दल असे म्हणता येणार नाही. पण हे काही प्रमाणात आहे. मारधाडीचे, हिंसक व्हिडिओ, वेबसीरीज मोठय़ा आवडीने बघितले जात आहेत. उतावीळपणा, इन्स्टंट हवंय ही प्रवृत्ती वाढीला लागतेय. मयंक लोहारच्या हत्येबाबत बोलायचे तर सहप्रवाशाने थेट चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. मयंक जिवंत राहील की नाही, याचा जराही विचार केलेला दिसत नाही. उलट थंड डोक्याने तो रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडला. म्हणजे पकडले जाण्याची त्याची भीड चेपली होती. आपण काही केले तरी कोणी मध्ये पडणार नाही, अशा आवेगात त्याने हत्या केली. या घटनेत आरोपी मुळात हिंसक वृत्तीचा असू शकतो. कारण त्याच्या खिशात चाकू होता.
रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून असे वाद होत असतात. काही लोक ते शांतपणे हाताळतात तर काही विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना या गोष्टी सहन करता येत नाही. त्यातच व्यसनाची जोड असेल तर कालच्या घटनेसारखी घडना घडते.
वेळीच उपचार, सामाजिक बांधिलकीची शिकवण
कुटुंबातील संवादाचा अभाव, एकटे राहणे, त्यातून वाढणारी चिडचिड या सगळ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. अशा लोकांमध्ये रागावरचे नियंत्रण सुटणे ही सामान्य बाब होते. अशी लक्षणे असतील तर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कुटुंबात संवाद वाढल्याने या समस्या सुटू शकतात. सामाजिक बांधिलकी बाबतही जागृती केली पाहिजे. म्हणजे रस्ता, ट्रेन हा कॉमन एरिया आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, या अनुषंगाने शिकवण देणे महत्त्वाचे आहे.
(लेखिका जे. जे. हॉस्पिटलच्या मनोविकृती शास्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.)






























































