
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नसरापूर अत्याचार व खून प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने नराधम भीमराव कांबळे (65) याला दोषी ठरविले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी निकाल राखून ठेवला असून, येत्या सोमवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी मृत्युदंड की जन्मठेप? याचा फैसला होणार आहे. राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या 58 दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागणारा हा दुर्मिळ खटला ठरला आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या चिमुरडीवर कांबळे याने अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांत तपास पूर्ण करून 1 हजार 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे 55 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
याप्रकरणी आज युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ऍड. अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्त्वपूर्ण निकालांचे दाखले दिले. चिमुरडी उन्हाळ्याची सुट्टी आनंदामध्ये घालवण्यासाठी आजीच्या घरी गेली होती. आरोपी गाठीशेव देतोय, गोठय़ातील वासरू दाखवतोय असे सांगत असल्याने चिमुरडीने आजोबा या नात्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत गेली. वासनेपोटी नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. नराधमाचे हे कृत्य घृणास्पद आणि क्रूर आहे. चिमुरडीवर मृत्यूनंतरही अत्याचार करणाऱ्या या नराधमाच्या देहबोलीवरून त्याला पश्चाताप झालेला दिसत नाही. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने त्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी ऍड. मिसर यांनी केली. पीडितेच्या कुटुंबीयांतर्फे ऍड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडताना कठोर शिक्षेची मागणी केली.
सरकार पक्षाने डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. यामध्ये तिचे अपहरण करणे, तिच्यावर बलात्कार करणे आणि तिची हत्या करणे हे सर्व आरोप सिद्ध झाल्याचेही न्यायालयाने सांगितले.
स्वत:ला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न
आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने याप्रकरणी दोषी ठरकले असून, ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचे सांगितले. कोणत्या गुह्यामध्ये काय शिक्षा आहे याची माहिती न्यायालयाने त्याला दिली. न्यायाधीशांनी कांबळे याला पिंजऱ्यात उभे करून, 1 मे रोजी घडलेला प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यावी, अशी विचारणा केली. त्यावर त्याने पुन्हा बनाव रचत ‘मी त्या दिवशी तिला गाठीशेव दिली. तिला घेऊन जाताना मी पाय घसरून पडलो आणि तिच्या डोक्याला लागले. तिला कॉटवर झोपवून शांत करताना ती मोठय़ाने ओरडू लागली,’ असे सांगितले. त्यावर न्यायालयाने तो इतिहास झाला असून, तुझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे तुला कोणती शिक्षा द्यावी, अशी पुन्हा विचारणा केली. त्यावर कांबळेने उत्तर दिले नाही.
‘नराधमाला फाशीच द्या’
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत नराधमाला फाशी देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारामध्ये सामान्य नागरिकांसह काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जमले होते. सुनावणीनंतर आरोपीला घेऊन जाताना ‘या नराधमाला फाशीच द्या,’ अशी घोषणाबाजी त्यांनी केली.






























































