ही गद्दारी शिवसेनेशी, हिंदूंशी, हिंदुत्वाशी; गद्दारांसोबत भाजपालाही याचा जाब विचारावा लागेल! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गद्दारांनी ही गद्दारी शिवसेनेशी नाही, तर हिंदूंशी, हिंदुत्वाशी केली आहे. याचा जाब फक्त गद्दारांना विचारून चालणार नाही, तर भाजपालाही विचारावा लागेल, अशी जबरदस्त तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथे डागली. शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांविरोधात महाराष्ट्रात प्रचंड चीड आणि संताप असून, ज्या मतदारांनी या खासदारांना निवडून दिले त्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झंझावाती दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात शनिवारी यवतमाळ येथून झाली. यावेळी कार्यकार्ता मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांसह भाजपाचाही खरपूस समाचार घेतला.

शिवसेना फक्त एकच आहे. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कुणीही उपरा आला आणि त्याला नाव दिले हे आम्ही मानायला तयार नाहीत. शिवसेना, भगवा फक्त एकच असून या भगव्याचा, शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागला. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहेत, तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत कुणी कितीही प्रयत्न केले तरी ठाकरेच काय शिवसेना संपवू शकणार नाहीत. तो विश्वास माझ्यात असून त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वचनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

पावसाळा सुरू असतानाही शेतीची कामं सोडून मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांचे, शेतकऱ्यांना धन्यवाद देत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर आसूड ओढला. अनेक सडलेली पानं गेली, पाऊस पडल्यावर कोंब उगवतात तसे तुम्ही नवीन कोंब उगवणारे कट्टर शिवसैनिक, निष्ठावान, शिवसेनाप्रमुखांच्या जीवाला जीव देणारा शिवसैनिक आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारांच्या मतदारसंघातील मतदारांचीही माफी मागितली.

माझ्या सांगण्यावरून जे बुजगावणे दिले होते त्याला अक्षरश: रक्ताचे पाणी करून, कशाचीही तमा न बागळता तुम्ही निवडून दिले. त्याच्याबद्दल मी यवतमाळ आणि वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो. तुम्ही केवळ शिवसेनाप्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरवशावर या गद्दाराला निवडून दिले होते. पण त्याने गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळे फासलेले आहे. याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार हा शेवटी गद्दारांच्या कळपात गेला. गद्दारांचा शिरमणी तिकडे बसलाय आणि त्याने 40 आमदार फोडले. विदर्भामध्ये जेव्हा बैलपोळा होता तेव्हा त्या बैलांवर 50 खोके, एकदम ओके लिहिले होते. तेव्हा आमदाराचा भाव 50 खोके होता, तर आता खासदाराचा किती असेल? म्हणजे हा धंदा झालाय. निवडून यायचे, आपला हमीभाव वाढवायचा आणि विकून टाकायचे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात गद्दार खासदार संजय देशमुख यांची एक व्हिडीओ क्लिपही ऐकवली. यात गद्दार खासदार संजय देशमुख आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाकरेंबरोबर आल्याचे म्हणतात. याचाही खरपूस समाचार घेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? चूक आपल्या सगळ्यांची, विशेषत: माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होती. तरी परत आले. शिवसेनेवर संकट आल्याने परत आल्याचे म्हणाले. अरे एवढे शिवसैनिक असल्यावर शिवसेनेवर संकट येऊच शकत नाही. तू तुझी चिंता कर, माझी करू नको.

पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी ठाकरे उभा आहे. तुमच्या विरोधात नाकावर टिच्चून जनेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवर निवडून आले होते. ते खासदार फोडण्याची वेळ का आली? त्यावेळी आपल्याला चिडवले जात होते की, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. मोदींची लाट असताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावर हक्काचे, महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते; कुठे गेली ती मोदींची लाट? असा खणखणीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

जे विकास निधी… विकास निधी बोबलताहेत ते दोन वर्षांमध्ये लोकसभेमध्ये किती वेळा हजर होते? काय आंदोलन त्यांनी केले? असा सवाल तर विकास निधीसाठी गद्दारी करणाऱ्यांवरही उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. मी माझे कर्तव्य म्हणून, आपला हा अन्नदाता आहे म्हणून दोन लाखांच्या पिक कर्जाच्या रकमेतून शेतकऱ्यांना मुक्त केले. आता सगळेच जण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असेल तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग, शेतकऱ्यांशी गद्दारी का करतोय? शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची ही गद्दार वृत्ती आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आपल्याकडे आता एसआयआर सुरू होत आहे. रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि आता पासपोर्ट हे नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय भाजपचे सदस्यत्व एवढेत नागरिकत्वाचा पुरावा धरणार का? आम्ही भाजपचे सदस्य नाही, कारण हा भारतीय जनता पक्ष नाही. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय अशी आम्हाला चिंता वाटायला लागलेली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांनी ही गद्दारी तुमच्या, आमच्याशी केली. स्वत:च्या आईबरोबर केली. शिवसेनेशी केली. एवढेच नाही तर आता राम मंदिराच्या दान पेटीतील पैसेही चोरले जात आहेत. चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती, त्याचे काय झाले माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचे काय झाले माहिती नाही. शिलापूजन वेळी स्वत: शिवसेनाप्रमुख गावोगाव फिरले होते आणि यवतमाळमध्येही आले होते. शिवसेनाप्रमुखांनी सर्व महाराष्ट्र पिंजून काढला होता. राम मंदिर वही बनायेंगे… या घोषणांनी तमाम हिंदूंना साद घातली होती. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. आज हिंदुत्वाचा अपमान होत आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदूंशी, हिंदूत्वाशी केली आहे. त्यामुळे फक्त गद्दारांना जाब विचारून नाही चालणार भाजपालाही जाब विचारावा लागेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

गद्दारांनो! शिवसेना जागेवरच आहे, तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा विधानसभा लोकसभेकडे जाईल – संजय राऊत

विधानसभेमध्ये यांनी आपले सरकार गद्दारी करून पाडले. अडीच वर्षे तुमचा राग तुम्ही धुमसता ठेवला होता आणि तो राग त्यांना लोकसभेत दाखवून दिलात. आता काही नसताना काही केले तरी चालते असे त्यांना वाटते. लोकांची स्मरणशक्ती किती आहे, किती आंदोलन करतील. एक आठवडा, एक महिना, दोन महिने, तीन महिने, सहा महिने… तीन वर्षानंतर जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही बघू, असे त्यांनी वाटते. पण हा विश्वासघाताचा राग धुमसता ठेवला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचे उदाहरण देत विकास निधीबाबत बोलणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. विकास निधी काय फक्त भाजपाच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपच्या विरुद्ध जे खासदार निवडून आले तिकडे भाजपचे मतदार नाहीत का? भाजपच्या विरोधात मतदान केलेली जनता माझ्या समोर, राज्यभर आणि देशभर पसरलेली आहे. ही जनता काय पाकिस्तानातून आलेली नाही. विकास निधीसाठी जर का काम अडले असते तर तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना का विकास निधी लागला नाही? गाडगे महाराजांनी विदर्भात खूप काम केले. त्यांची दशसूत्र प्रसिद्ध आहेत. जो भुकेला असेल त्याला अन्न देणे, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणे, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणे, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणे, असे म्हणत त्यांनी एक समाजकार्य उभे केले, स्वच्छता मोहीम राबवली. विकास निधीवाचून त्यांचे कार्य कुठे अडले होते. कोणतेही सत्तापद त्यांनी भोगले नव्हते, ना कधी आमदार झाले होते ना कधी खासदार झाले होते. पण लोकांना शिक्षण दिले, म्हणून इतक्या वर्षानंतर सुद्धा लोक मुख्यमंत्री किंवा गद्दारांना मानण्याऐवजी गाडगे महाराजांना, तुकडोजी महाराजांना नमस्कार करतात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. साधनसामुग्री आहे. पण आमच्याकडे जिवंत माणसं आहेत. तुकडोजी महाराज म्हणतात, झाड़ झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगे सेना। पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे! यानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेले नाही, तर इंग्रजांशी लढून मिळवलेले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अटलजी गेले, अडवाणी यांना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधीची चणचण भासली नाही. अटलजी आणि अडवाणी यांनी कधी म्हटले असते, आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहांचा राजकीय जन्म झाला असता का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष झाले पाहिजे यासाठी फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप केला. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. आज गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जाब विचारला पाहिजे. मी तुला निवडून दिले, माझ्या रक्ताचे पाणी केले, रक्त आटवले. तरीही तू माझ्याशी गद्दारी का केली? मी भगव्याला, निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झाला. तुला काडीचीही किंमत नव्हती. बोल गद्दारी का केली? पुढचे तीन वर्षे हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल, आहे हिंमत, असे विचारताच शिवसैनिकांनी गगनभेदी आवाजात हो म्हटले.

दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. तेव्हा हे महाशय मला म्हणाले, घरी सोयरीक जुळवायची आहे. पाहुणे येणार आहेत. मी व्हिडीओवरून आलो तर चालेल का? आता घरचे शुभ कार्य म्हणून मी नाही कसे बोलू शकतो. आता मला काय माहिती मुलीची सोयरीक जुळवताना यांची सोयरीक तिकडे जुळवतील. हे पाहुण्यांकडे चालले होते, की पाहुणे यांच्याकडे येत होते. सोयरीक यांची जुळत होती, पण सांगितले मुलीची सोयरीक जुळवत आहेत. मी रात्री फोन केला. म्हटले काय जुळले का? ते हो, जुळले म्हणाले… जुळले ते दोन दिवसांनी कळले… गेले सासरी, आता गद्दारांच्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचे जीवन जगत होता, तिकडे गाढवाचे जीवन जगा. जे ओझे तुमच्या पाठीवर टाकले जाईल ते वाहत राहा, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदार संजय देशमुख यांना लगावला.

शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. प्रेमाच्या भावनेवर जिवंत राहतो असा जगात दुसरा पक्ष नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मी लढायला तयार आहे. मी हटणार नाही कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावरून भाजपच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली. सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृतीचे मोर्चे काढणारे आता झोपलेत का? असा सवाल करत आता आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना लवकरच आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भोंदूंच्या विळख्यात आमचा राम सापडलेला आहे. श्रीरामाला भोंदू हिंदूंकडून सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रात टाकेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत. नीटचे पेपर फुटत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. राम मंदिर लुटले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने लुट चालली आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचे धाडस गद्दारांच्या रक्तात आहे का? हा स्वाभिमान, ही हिंमत, ही धमक शिवसेनेत आहे. प्रश्न विचारायचे धाडस फक्त शिवसैनिक करू शकतो, म्हणून हे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. जोपर्यंत हृदयामध्ये आग लागलेला शिवसैनिक आहे तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कुणी संपवू शकत नाही, असा हुंकार उद्धव ठाकरे यांनी भरला.

निवडणुका नसतानाचा काळ फोडाफोडीसाठी निवडलेला आहे. लोकसभेवेळी त्यांची घोषणा होती, ‘अब की बार 400 पार’. तेव्हा मी ‘अब की बार तडीपार’ ही घोषणा दिली होती. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये त्यांना बदल करायचा आहे. निवडणुकीमध्ये दोन तृतियांश बहुमत मिळाले नाही, तर फोडाफोडी करून करा. एकदा की ही संख्या झाली की मग घटनेत पाहिजे तसा बदल करून टाका. समोर आहे कोण विचारायला. कारण सगळेच फोडलेले आहेत. सगळेच त्यांनी पक्षात घेतलेले आहेत. ही सगळी गुलामगिरीची राजवट आणि हुकुमशाहीची राजवट रोखण्यासाठी साधू संतांची परंपरा लागलेला, शाहू-फुले-आंबेडकरांची परंपरा लागलेला महाराष्ट्र हा जागा राहणार की नाही आणि त्यांच्या समोर उभा राहून प्रश्न विचारणार की नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.