या भ्रष्टाचारी सरकारचाही पेपफुटीत सहभाग, अंबादास दानवे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेचा (TET) पेपर फुटल्यामुळे ही परिक्षा रद्द करण्यात आली आहे. ठाण्यातील भिवंडी येथे उद्या होणाऱ्या पेपरच्या प्रश्नपत्रिका सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

”या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता आला नाही. NEET चा पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रात आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या, झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. पण आहे कुठे गुड गव्हर्नन्स? कुठे आहे झिरो टॉलरन्स. एवढ्या लोकांना तुरुंगात टाकूनही टीईटी पेपर फुटतो. याचाच अर्थ या सरकारचा देखील या पेपरफुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत त्यांचाच पेपर फुटतो. हे कमकुवत आणि भ्रष्टाचारी सरकार आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

”TET ही राज्यस्तरावरची शिक्षकांसाठीची परिक्षा आहे. असा पेपर देखील सरकार सुरक्षित ठेवू शकत नाही. अशी छोटीशी परिक्षा देखील सरकार मॅनेज करू शकत नाही. याचाच अर्थ सरकार भगवान भरोसे सुरू आहे”, असे अंबादास दानवे म्हणाले. ”याच्यात परिक्षा देणाऱ्याला त्रास होतो. परिक्षार्थी महिनोमहिने तयारी करत असतो. अचानक परिक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होतो व त्यामुळे त्याचा निकालावर परिणाम होतो”, असे अंबादास दानवे म्हणाले.